राष्ट्रसंतांची 'ग्रामगीता' ही काल, आज आणि उद्या अशा तिन्ही काळांचा विचार करणारा कालदर्शी ग्रंथ आहे. राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेला 'ग्रामगीता माझे हृदय' असे म्हटलेले आहे. राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत गावातील मानव हा केंद्रबिंदू मानला आहे. म्हणून माणूस अगोदर सुधारला पाहिजे, अशी राष्ट्रसंतांची मनस्वी तळमळ होती. मानवी वर्तनात सुधारणा करण्यासाठीच ग्रामगीता लिहिण्याचा मुख्य उद्देश होता. प्रयोजन होते. आजपर्यंत नैतिक रूढी, परंपरा, शिक्षण, सग्रंथ, कुटुंब, संत-महंत, समाजसुधारक, युगपुरुष यांनी मानवी वर्तन सुधारण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येते. राष्ट्रसंत ग्रामगीतेच्या माध्यमातून म्हणतात-
'प्रथम पाया मानव वर्तन। त्यास करावे उत्तम जतन।
गाव करावे सर्वांगपूर्ण। आदर्श चित्र विश्वाचे।।'
अशा प्रकारे अतिशय सुंदर, आदर्श असं आपलं गाव करायचं असेल, तर त्यासाठी आपण नीतीमत्तेने, माणुसकीने वागलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. राष्ट्रसंतांनी ग्रामगीता लिहिताना अतिशय व्यापक दृष्टीकोन ठेवून विश्वाला पुढे नेण्याचं कार्य हाती घेतले. राष्ट्रसंतांना समाजातील प्रगतीत अडसर ठरणार्या, गावाला पुढे जाऊ न देणार्या गोष्टी दिसल्या आणि त्या अडचणीतून मार्ग काढल्याशिवाय आपल्या गावाचा विकास होऊ शकत नाही हे त्यांनी जाणलं होतं. अमूल्य जीवन तत्वज्ञानाचा समावेश असणारा ग्रामगीता ग्रंथ काही ठिकाणी घरच्या देव्हार्यासमोर ठेवून पूजा करताना पाहतो, तेव्हा खरच खूप वाईट वाटतं. ग्रामगीता हे एक असं अद्भूूत रसायन आहे, की जे माणसाला नीतीमान, आदर्श बनवण्याचे कार्य करते. पारंपरिक पद्धतीने, घाईघाईने पारायण करण्याकरिता ग्रामगीता लिहिली नाही, तर या ग्रंथातील प्रत्येक शब्दाचा अर्थ, भावार्थ आणि गुढार्थ समजून घेऊन त्यानुसार वाटचाल करण्यासाठी आहे हे विसरता कामा नये.
या संदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात-
'ग्रामगीता नव्हे पारायणासि। वाचता वाट दावी जनांसी। समूळ बदलवी जीवनासी। मनी घेता अर्थ तिचा।। ही नव्हे फुले टाकण्यासाठी। ही ग्रामाची उध्दारदृष्टी। आजच्या युगाची संजीवनी बुटी। मानतो आम्ही ग्रामगीता।।'
ही ग्रामगीता ग्रामनाथला अर्पण केलेली समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायावर आधारित आदर्श समाजरचनेची संहिता आहे. हे कदापि विसरता येणार नाही. ग्रामगीता जो वाचेल व त्याप्रमाणे आचरण करेल त्याचे समूळ जीवनच बदलून जाईल इतकी क्षमता, सामर्थ्य या ग्रंथात आहे. त्यामुळे इतर धर्मग्रंथांप्रमाणे ग्रामगीतेला लाल कपड्यात ठेवून पूजा करू नये किंवा त्यावर फुले उधळू नये, असे वं. महाराज सांगतात. ग्रामगीता ग्रंथातील ओवीचा अर्थ समजून वाचल्यास त्यामध्ये प्रत्येक माणसाला आपल्या प्रगतीचा योग्य मार्ग दिसेल. त्यासाठी ग्रामगीता प्रत्येक माणसाने आचरणात आणण्याचा, कृतीत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ग्रामगीतेतील विचार हे आपल्या मनी, ध्यानी, आचरणी जेव्हा आपण उतरवू तेव्हा आपले संपूर्ण जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. आजपर्यंत शिवगीता, कृष्णगीता, रामगीता, हंसगीता, हनुमंतगीता, पांडवगीता, दत्तगीता, भगवद्गीrता, गुरूगीता, अशा अनेक गीता रचल्या गेल्या. या संदर्भात राष्ट्रसंत म्हणतात-
'कृष्णगीता, रामगीता। हंसगीता, हनुमंतगीता। शिवगीता, अवधूतगीता। कथिल्या कोणी।।६९।।
गुरूगीता, गणेशगीता। पांडवगीता, भगवद्गीता। देवगीता, देवी गीता। सर्व झाल्या।।७०।।
सर्वांचा एकचि सार। शुध्द करावे हृदय मंदिर। सुखी करावे चराचर। तरीच पावे सद्गति।।७१।।'
भावार्थ हाच, की सर्व धर्मग्रंथांचा सार किंवा उद्देश एकच असतो आणि तो म्हणजे माणसाचं हृदय, अंतःकरण शुध्द झालं पाहिजे, पवित्र झालं पाहिजे आणि सर्व मानवजात सुखी झाली पाहिजे, तरच सद्गती प्राप्त होते.
तात्पर्य- राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेत व्यक्तीचा, कुटुंबाचा, समाजाचा, गावाचा, देशाचा व शेवटी ब्रह्मांडाच्या विकासाचा, उध्दाराचा अमूल्य विचार आहे. म्हणून तर ग्रामगीता ही आजच्या युगाची संजीवनी बुटी आहे. आजच्या विज्ञान-तंत्रज्ञान-कॉम्प्युटर-इंटरनेट व ए.आय. काळात आणि समोरच्या अतिशय कठीण युगात माणसाने कसं जगायचं, कसं आचरण करायचं याचं जीवन तत्वज्ञान व जीवनकौशल्य ग्रामगीता देते.
आपण आपल्या जीवनातील अनेक उदाहरणं बघत आहोत, अनुभवत आहोत, की ज्या ज्या लोकांनी ग्रामगीता आपल्या जीवनात प्रत्यक्ष उतरवण्याचा प्रयत्न केला किंवा उतरविली ते आज यशाच्या, शांती- समाधानाच्या, किर्तीच्या शिखरावर पोहचले आहेत. ज्या ज्या गावांनी आपले स्वच्छ, सुलभ, आदर्श बनविले, ही ग्रामगीतेची फलश्रुती आहे.
आणि त्यांनी आपले ग्रामगीताधिष्ठीत ग्रामजीवन बनविण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. हजारो वक्ते, नेते, पुढारी बेताल मोठ-मोठ्या विकासकामांच्या गोष्टी करतात; परंतु कृती मात्र शून्य असते. वक्तृत्व, नेतृत्व व कर्तृत्व ह्यांचा योग्य समन्वय नसतो. म्हणून माणसाने फालतू वायफळ बोलण्यापेक्षा जर थोडीशी कृती केली तरी ती विकासासाठी फार मोलाची ठरत असते.
या संदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परखडपणे म्हणतात-
'एक हात खोदावी जमीन। हे पुजनाहुनी पूजन।
परिणाम शेकडो व्याख्यान्याहून। अधिक त्याचा।।'
ग्रामगीतेचे घरात किंवा कुटुंबात जरी एकांतात वाचन केले, मनन केले, चिंतन केले आणि त्या कुटुंबाने त्यानुसार कृती केली तर ते घर किंवा कुटुंब आदर्श होईल. अशा आदर्शवादी घरापासून सारे लोक प्रेरणा घेऊन तसे वर्तन करतील, असा विश्वास वं. तुकडोजी महाराजांनी केलेला आहे.
विजय पिंपळशेंडे
सेवानिवृत्त प्राचार्य, वरोरा
मो. नं.: ९२२६१८३३६१