Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > संपादकीय > प्रहार

प्रहार

आधुनिक सायकल संस्कृती देशाला वाचवू शकते!

सायकल ही केवळ गरिबांची किंवा विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था नाही. आज जगातील विकसित देशांनी तिला आरोग्य, पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांचा आधारस्तंभ बनवले आहे.


आधुनिक सायकल संस्कृती देशाला वाचवू शकते

सायकल ही फक्त एका नागरिकाचा प्रवास नसतो; ती देशाच्या आरोग्याचा, अर्थव्यवस्थेचा आणि पर्यावरणाचा प्रवास असतो हे मनावर बिंबवून ती राष्ट्रीय सवय बनवायची  आज गरज आहे. त्याकरिता स्वतःपासून सुरुवात म्हणून मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी आणि देशातील प्रभावी नागरिक, खेळाडू, सिनेस्टार ह्यांनी सायकली चालवायला सुरुवात केली आणि सायकलला प्रतिष्ठा मिळवून दिली, तर नागरिकसुद्धा साथ देतील. देशाला सुदृढ आणि मजबूत बनवण्याचा हा अगदी सोपा मार्ग आहे.

 भारतात एका बाजूला सरकार नागरिकांना आरोग्य, योग, फिटनेस आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देते. दुसऱ्या बाजूला पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या आयातीमुळे परकीय चलनावर पडणारा ताण कमी करण्याची गरज व्यक्त करते; पण या दोन्ही उद्दिष्टांना एकाच वेळी साध्य करणारा सर्वात सोपा, स्वस्त आणि परिणामकारक उपाय आपल्या डोळ्यासमोर असूनही त्याकडे गंभीरपणे पाहिले जात नाही. तो उपाय म्हणजे ‘सायकल संस्कृतीचा व्यापक प्रसार.’
सायकल ही केवळ गरिबांची किंवा विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था नाही. आज जगातील विकसित देशांनी तिला आरोग्य, पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांचा आधारस्तंभ बनवले आहे. भारतात मात्र सायकलकडे अजूनही मागासलेपणाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते, अर्थात तिला प्रतिष्ठा नाही, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.
 भारतात दरवर्षी कच्च्या तेलाच्या आयातीवर अब्जावधी डॉलर खर्च होतात. पेट्रोल-डिझेलचा वापर जितका वाढेल तितका परकीय चलनाचा ताणही वाढत जाईल. त्याच वेळी शहरांमध्ये वाढती वाहतूक कोंडी, वायूप्रदूषण आणि इंधनाचा अपव्यय आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पार्किंग ही मोठी समस्या बनली आहे. जर शहरातील लाखो नागरिकांनी दोन-पाच किलोमीटरच्या अंतरासाठी मोटारसायकल किंवा कारऐवजी गियरची सायकल वापरली, तर इंधन, परकीय चलन बचत, प्रदूषण, पार्किंग समस्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आरोग्य सुधारेल.
सायकल हा सर्वोत्तम व्यायाम आहे. आज मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब यांसारखे जीवनशैलीशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत. सरकार योग दिन साजरा करते, फिटनेसचे संदेश देते; पण रोजच्या जीवनात व्यायाम सहजपणे कसा आणायचा याचा विचार होताना दिसत नाही. सायकल हा त्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. स्वतंत्रपणे वेळ काढून व्यायाम करण्याकरिता पैसे खर्च करून जिममध्ये जाऊन तेथील दिखावटी सायकल चालवायची, ट्रेडमील वर धावायचे त्यापेक्षा प्रत्यक्ष सायकल चालवत किंवा धावत आपण आपल्या कार्यस्थळी जर गेलो, तर ती गोष्ट बुद्धिमानतेचे द्योतक आहे; मात्र यासाठी नागरिकांना दर्जेदार गियरच्या सायकली सहज उपलब्ध होणे आवश्यक आहे.
दुर्दैवाने जगामध्ये तंत्रज्ञानाचा स्फोट होऊन नवनवीन उत्पादने, अगदी ड्रोन निर्माण होत असताना, भारतात मात्र साध्या जागतिक दर्जाच्या, हलक्या, मजबूत आणि आधुनिक गियरच्या सायकलींचे उत्पादन अत्यल्प आहे, कारण सायकलला प्रतिष्ठा नाही, अशा वेळेस थोडी महाग असलेली गियरची सायकल विकत घेणार कोण? मागणीच नाही तर तिचे उत्पादन करणार कोण? आणि कशाला? परिणामी गियरच्या सायकली परदेशी चलन खर्च करून आयात कराव्या लागतात. त्यांच्यावर आयात शुल्क, जीएसटीसारख्या करांचा इतका मोठा बोजा असतो, की सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर त्या सायकलची किंमत जाते.
गियरच्या सायकलींचे वैशिष्ट्य म्हणजे त्या चालवायला तुलनेने कमी श्रम लागतात. चढावावर, लांब अंतरावर किंवा शहरातील वाहतुकीतही त्या सहज चालतात. वजनाने हलक्या असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थीही त्यांचा सहज वापर करू शकतात. त्यामुळे लोकांचा सायकलकडे ओढा वाढू शकतो.
सरकारने येथे मूलभूत विचार करण्याची गरज आहे. ज्या वस्तू आरोग्य सुधारतात, पर्यावरणाचे संरक्षण करतात आणि इंधनाची बचत करतात, त्यांच्यावर करांचा बोजा का असावा? शिक्षण, आरोग्य आणि व्यायामाशी संबंधित साधनांना महसूल कमावण्याचे साधन म्हणून नव्हे, तर सामाजिक गुंतवणूक म्हणून पाहिले पाहिजे.
सरकारने गियर सायकलींवरील आयात शुल्क आणि जीएसटी मोठ्या प्रमाणावर कमी करावा किंवा पूर्णपणे माफ करावा. त्याचबरोबर भारतात आधुनिक सायकलींचे उत्पादन सुरू करणाऱ्या उद्योगांना विशेष प्रोत्साहन, संशोधनासाठी मदत आणि उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजना दिल्या पाहिजेत. आवाक्यातील किंमत असेल, तर सामान्य गरजवंत माणसेसुद्धा ती विकत घेऊ शकतील.
जर सरकारला खरोखरच पेट्रोल-डिझेलची आयात कमी करून परकीय चलन वाचवायचे असेल, नागरिकांचे आरोग्य सुधरवायचे असेल, प्रदूषण कमी करायचे असेल आणि शहरांतील वाहतूक कोंडी कमी करायची असेल, तर सायकलला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली पाहिजे.
सायकल वापरण्यासाठी फक्त सायकल पुरेशी नसते, तर तिला गियर असणे गरजेचे आहे, तसेच सुरक्षित सायकल ट्रॅक, पार्किंगकरिता सायकल स्टॅन्ड, सार्वजनिक वाहतुकीशी समन्वय आणि नागरिकांना प्रोत्साहन देणारी धोरणेही आवश्यक असतात. विकसित देशांनी हे खूप आधी ओळखले आहे.
आज मुलांवर अभ्यासाचा एवढा प्रचंड ताण असतो, की मुलांना व्यायाम करायला वेळच मिळत नाही. त्यामुळे सायकलच्या सुरक्षित ट्रॅक बनवल्या, तर पालक मुलांना सायकलीद्वारेच शाळा, कॉलेज, शिकवणी वर्ग, फिरणे याकरिता अशा आधुनिक गियरच्या सायकली घेऊन देऊ शकतात, ज्यामुळे त्यांचा व्यायाम होईल आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वाससुद्धा निर्माण होईल; मात्र आज रस्त्याची हालत आणि अपघाताचे, अपहरणाचे प्रमाण पाहता पालक हे करायला धजावत नाहीत. त्यामुळे अनेक पालक वाहन घेऊन त्यांना सोडायला जातात, परिणामी बहुमोल वेळ आणि इंधन वाया जाते.
सरकारने लोकांना, मोफत धान्य किंवा विद्यार्थ्यांना खिचडी देण्याऐवजी कार्यक्षम अशा ह्या गियरच्या सायकली आणि सुरक्षित रस्ते दिले, तर देशांत मोठा बदल सुरू होईल. 
‘अखिलेश यादव’ यांच्या पक्षाचे सायकल हे चिन्ह आहे, त्यांनी सत्तेत आल्यानंतर किमान त्यांच्या राज्यात हा प्रयोग केला, तरी एका नव्या युगाची सुरुवात देशात होईल.
जगात फिरत असताना अनेक देशांमध्ये मला दिसले, की तेथे मोठ्या प्रमाणावर नागरिक सायकलींचा वापर करतात. कार्यालयात जाणारे कर्मचारी, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकही मोठ्या प्रमाणावर सायकलवरच प्रवास करतात. अनेक ठिकाणी लोक सायकल चालवत थेट मेट्रोच्या किंवा लोकलच्या अंडरग्राउंड प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर रेल्वे डब्यातील विशेष हुकांवर सायकल लटकवतात. स्टेशन आल्यानंतर लटकवलेली सायकल काढून घरी किंवा कार्यालयात जातात. यासाठी अंडरग्राउंडमध्ये जाण्या-येण्याकरिता स्वतंत्र रॅम्पची उत्कृष्ट व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे सायकल हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.
नेदरलँड्सचे तब्बल १४ वर्षे पंतप्रधान राहिलेले Mark Rutte यांनी पदाचा कार्यभार नव्या सरकारकडे सोपवल्यानंतर कोणताही सरकारी ताफा, लाल दिव्याची गाडी किंवा दिखाऊ सोहळा न करता स्वतःची सायकल घेतली आणि शांतपणे घरी रवाना झाले. त्यांचा हा साधेपणा आणि सायकल संस्कृतीवरील विश्वास जगभरात चर्चेचा विषय ठरला. नेदरलँड्सच नव्हे, तर अनेक देशांत सायकल ही केवळ वाहतुकीचे साधन नसून समानता, साधेपणा आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचे प्रतीक मानली जाते.
मागे 2021 ला मी देशामध्ये कोरोनाचा “बागूलबुवा” उभा केलेला असताना ग्रामीण भागात त्याविषयी जनजागृती करण्याकरिता आणि तीन काळ्या कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या चारही सीमा रोखून बसलेल्या शेतकऱ्यांना समर्थनार्थ जनजागृती करण्याकरिता, मुक्त संचारावर सरकारने लादलेली बंदी झुगारून माझे सहकारी अविनाश काकडे, गजानन अमदाबादकर, मेजर (निवृत) शेषराव मुरडिया, अॅड. सतीषचंद्र रोठे, परशराम सुरजुसे (अण्णा), आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील १० मुले, आणि इतर १५ शेतकरी अशा एकंदर ३० लोकांना सोबत घेऊन अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नांदेड, वर्धा, अमरावती आणि परत अकोला असा, ३ मार्च ते १७ मार्च, केवळ १५ दिवसांत ९६० किलोमीटरचा प्रवास, म्हणजे दररोज साधारण ६५ िकमी, माझ्यासारख्या ७० वर्ष वय असलेल्या व्यक्तीने केवळ गियरच्या सायकलीनेे केला.
त्यावरून माझ्या लक्षात आले की, “आधुनिक गियरची सायकल ही सर्वसामान्य नागरिकासाठी दैनंदिन वाहतुकीचे सक्षम माध्यम बनू शकते.”
प्रश्न एवढाच आहे, की जनतेला पेट्रोल बचतीचे पोकळ आवाहन करायचे? योगाच्या नुसत्याच बाता करायच्या? 
गियरच्या सायकलचा पर्याय लोकांना उपलब्ध करून  देऊन  रस्त्यावर धावणारी प्रत्येक सायकल ही फक्त एका नागरिकाचा प्रवास नसतो; ती देशाच्या आरोग्याचा, अर्थव्यवस्थेचा आणि पर्यावरणाचा प्रवास असतो हे मनावर बिंबवून ती राष्ट्रीय सवय बनवायची  आज गरज आहे. 
त्याकरिता स्वतःपासून सुरुवात म्हणून मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी आणि देशातील प्रभावी नागरिक, खेळाडू, सिनेस्टार ह्यांनी सायकली चालवायला सुरुवात केली आणि सायकलला प्रतिष्ठा मिळवून दिली, तर नागरिकसुद्धा साथ देतील. देशाला सुदृढ आणि मजबूत बनवण्याचा हा अगदी सोपा मार्ग आहे.
   देश आज अत्यंत कठीण काळातून जात आहे, त्यामुळे जनजागृतीकरिता पुन्हा एकदा सायकल यात्रा काढण्याची गरज आहे. ज्यांना माझा हा विचार पटतोय आणि साथ देऊ शकतात, अशा कृतिशील लोकांनी खालील व्हाॅट्सअप नंबरवर आपले नाव, गाव आणि प्रतिक्रिया कळवाव्यात, म्हणजे यात्रेचे नियोजन करता येईल.
आपल्या प्रतिसादाची वाट पाहतोय!!

प्रकाश कमलाताई गोपाळराव पोहरे
मो. नं. : +९१-९८२२५९३९२१
प्रतिक्रिया देण्यासाठी थेट प्रकाश पोहरेंना संपर्क करा किंवा
आपल्या प्रतिक्रिया 2prakashpohare@gmail.com या इ-मेल किंवा
९८२२५९३९२१ या व्हॉट्सअप वर पाठवा.
प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहायला विसरू नका.

Related to this topic: