विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने अगदी शेवटच्या क्षणी आपल्या अंतिम उमेदवारांची नावे घोषित केली. त्याआधी जागावाटपाचा घोळ बराच रंगला. महाविकास आघाडीने मात्र तुलनेत जागावाटपाचा निर्णय बर्याच आधी मार्गी लावला. अर्थात अगदी मोजक्याच जागांवर आघाडीला विजयाची पुसट संधी असल्यामुळे आघाडीत कुणीही फारसे ताणून धरले नाही. महायुतीमध्ये मात्र जागावाटपाचे गुर्हाळ बरेच रंगले. नेहमीप्रमाणे एकनाथ शिंदेंनी शेवटपर्यंत ताणून धरण्याचा प्रयत्न केला आणि नेहमीप्रमाणे शेवटी त्यांना माघार घ्यावी लागली. शिंदेंना यावेळी सात जागा हव्या होत्या; परंतु भाजप त्यांना चारपेक्षा अधिक जागा देण्यास तयार नव्हती. शेवटी शिंदेंनी दाद मिळावी म्हणून अमित शाहांचे दार ठोठावले. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या जागावाटपासाठी दोन दिवस दिल्लीत ठाण मांडून बसले होते. शेवटी शिंदेंना केवळ चार जागांवरच समाधान मानावे लागले. भाजप राष्ट्रवादीलादेखील एकपेक्षा अधिक जागा सोडण्यास तयार नव्हती. पुण्याच्या जागेवरून वाद होता. भाजप ही जागा सोडण्यास तयार नव्हती; परंतु शेवटी प्रश्न थोडा भावनिक झाला. अजितदादांच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला स्थान न मिळणे पक्षासाठी अवघड झाले असते. शेवटी भाजपने अजितदादांप्रती आदर दाखवित पुण्याची जागा राष्ट्रवादीला सोडण्याची तयारी दर्शविली; परंतु इथे राष्ट्रवादीमध्येच मोठे नाराजीनाट्य रंगले. खरे तर विधानपरिषदेच्या मागच्या निवडणुकीतच पार्थ पवारांनी विक्रम काकडेंसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. हे विक्रम काकडे म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते संजय काकडेंचे सुपुत्र. ते राष्ट्रवादीचे साधे सदस्यदेखील नव्हते; परंतु मैत्रीसाठी पार्थ पवारांनी त्यांच्या नावाचा आग्रह धरला होता. त्यावेळी या नावावरून राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये बरीच धुसफूस झाली होती. पार्थ पवारांनी सुचविलेल्या या नावाला राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रचंड विरोध केला, त्यामुळे अखेरच्या क्षणी झिशान सिद्दीकी यांच्या पारड्यात उमेदवारी पडली. यावेळी मात्र पार्थ पवारांनी विक्रम काकडेंना उमेदवारी मिळवून दिली. विक्रम काकडेंसाठीच राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून मागून घेतली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी काकडे पितापूत्र राष्ट्रवादीत सामील झाले. विक्रम काकडेंना अशाप्रकारे उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक नेते नाराज आहेत. एका माजी आमदाराने तर अजित पवार असते तर असे कधीच झाले नसते, त्यांनी पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती, आता अजितदादा नाहीत म्हटल्यावर सामान्य कार्यकर्त्यांचे कुणी वालीच उरले नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया दिली. कोकणातील मतदारसंघात सुनील तटकरेंनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत आपल्या मुलाला दुसर्यांदा उमेदवारी मिळवून दिली. या जागेवरही शिंदे सेनेचा दावा होता. त्या बदल्यात शिंदे गटाला किमान पालकमंत्रिपद तरी भेटते का हे लवकरच स्पष्ट होईल. दुसरीकडे शिंदेंना हवी असलेली जळगाव आणि संभाजीनगरची जागा भाजपने आपल्याकडेच राखली. त्यामुळे संभाजीनगरमध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाने बंडखोरी केली आहे. परभणीत शिंदेंनी विप्लव बाजोरियांना बाजूला सारत अल्पसंख्याक सेलच्या पदाधिकार्याला उमेदवारी दिली. नाशिकची जागा शिंदे सेनेला मिळाली असली तरी तिथे राष्ट्रवादीकडून बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या एकूण वाटाघाटीत फायदा भाजपलाच होत असल्याचे दिसते. मागच्या वेळी भाजपकडे आठ जागा होत्या आता भाजप अकरा जागांवर लढत आहे. शिवसेनेकडे मागच्या वेळी पाच जागा होत्या, आता शिंदेंना चार जागांवर समाधान मानावे लागत आहे. फोडाफोडी, पाडापाडीचे राजकारण झाले नाही तर या सतरापैकी बहुतेक जागांवर महायुतीचेच उमदेवार विजयी होतील, एखाद-दुसर्या जागेवर चुरशीची लढत होऊ शकते. शिवाय त्यातही भाजपचाच वरचष्मा स्पष्टपणे दिसून येतो. भाजप लढवित असलेल्या अकराही जागा भाजप जिंकण्याच्या स्थितीत आहे. दगाफटका झालाच तर शिंदे सेना किंवा राष्ट्रवादी लढत असलेल्या जागांवर होईल. एकूणच जागावाटप आणि निवडणूक या दोन्हीमध्ये भाजप आपला वरचष्मा कायम राखण्यात यशस्वी झाल्याचे दिसते.