Sonam Wangchuk Andolan: सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ यवतमाळच्या संविधान चौकात विविध चळवळीतील सामाजिक व विद्यार्थी संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन
यवतमाळ (Sonam Wangchuk Andolan) : केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या आंदोलनास हुकुमशाही पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ यवतमाळच्या संविधान चौकात विविध चळवळीतील सामाजिक व विद्यार्थी संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
नीट पेपरफुटी विरोधात दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर सीजेपीसह पर्यावरणवादी व शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक (Sonam Wangchuk Andolan) यांनी २८ जूनपासून आमरण उपोषण सुरू केले होते. २० दिवसांपासूनच्या उपोषणादरम्यान सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावल्यामुळे यांच्याशी सरकारने कुठल्याही प्रकारची चर्चा न करता पोलिसांनी बळजबरीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून सरकार विद्यार्थ्यांच्या आंदोलनास हुकुमशाही पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ येथील संविधान चौकात विविध चळवळीतील सामाजिक व विद्यार्थी संघटनांच्या वतीने रोको आंदोलन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपर फुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, या मूळ मागणीसह, सरकारने राम मंदिर चोरी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशा विविध मागण्यांसाठी एक ते दीड तास रस्ता रोको आंदोलन करून सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसह सामाजिक चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.