Saint Namdev Palkhi: पालखीचे आगमन होताच पालखी मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. यंदा पालखीचे ३१ वे वर्ष आहे. संत नामदेव महाराज संस्थानने अखंडितपणे पायदळ वारीची परंपरा कायम ठेवली.
रिंगण सोहळा पाहून उपस्थितांच्या डोळ्याचे फिटले पारणे
फटाक्यांच्या आतषबाजीत पालखीचे स्वागत, अद्भूत रिंगण सोहळा
चोख बंदोबस्त, ३१वर्षांची परंपरा
हिंगोली (Saint Namdev Palkhi) : पालखीचे आगमन होताच पालखी मार्गावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. यंदा पालखीचे ३१ वे वर्ष आहे. संत नामदेव महाराज संस्थानने अखंडितपणे पायदळ वारीची परंपरा कायम ठेवली. या पालखी सोबत शेकडो भाविक पंढरपूरची वारी करत असतात.
दर्शनासाठी हजारो भाविकांची मांदियाळी
नांदेड नाक्यावरून पालखी (Saint Namdev Palkhi) डोलताशा टाळ मृदंगाचा गजर व मुखी हरिनाम घेत पालखी इंदिरा गांधी चौकातून पालखी रामलिला मैदानावर गेली. येथे पालखीचे पहिले गोल रिंगण झाले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक हा सोहळा पाहण्यासाठी दाखल झाले. रात्री हिंगोली शहरातील कल्याण मंडपात पालखीचा मुक्काम होता. येथे कागलीवाल परिवाराच्या वतीने पालखीतील वारकर्याच्या भोजनाची व्यवस्था केली. मंगळवारी पालखी औंढा येथे मुक्कामी थांबणार आहे. त्यानंतर बाराशीव, हट्टा, परभणी, पोखर्णी, गंगाखेड, उकडगाव, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, बोरी सावरगाव, वडगाव रामा, मसा, दगड धानोरा, खांडवी, चिंचगाव टेकडी, लहुळ, आष्टीमार्गे पंढरपूरकडे रवाना होईल. दरम्यान पालखीचे दुसरे रिंगण परळी वैजनाथ, तिसरे अंबाजोगाई व चौथे रिंगण जऊळबन येथे होणार आहे.
हिंगोली: लाखो भक्तांचे श्रद्धा व दैवत असलेल्या हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील श्रीसंत नामदेव महाराजांची पालखी दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी महोत्सवानिमित्त पंढरपूर वारीसाठी नर्सी येथून रविवार सकाळी ७ वा.मंदिरामधून ४०० वारकर्यांसह हजारो भाविकांच्या सहभागाने राजवैभवी थाटात वारी निघाली. हिंगोलीत ६ जुलै सोमवारी ही पालखी दाखल होताच ढोल-ताशांचा गजर व फटाक्यांच्या आतषबाजीत पालखीचे स्वागत केले. यावेळी घोडेस्वार स्वागतासाठी सहभागी झाले. यावेळी संत नामदेव महाराजाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला.
नर्सी येथून नामदेव महाराज यांची पालखी (Saint Namdev Palkhi) निघण्यापूर्वी रविवार मंदिरामध्ये विश्वस्तांच्या हस्ते पालखीत सहभागी वीणेकरी तसेच नामदेव महाराजांच्या मूर्तीचे व पालखीचे पूजन करण्यात आले. उपस्थितांनी पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर नर्सी येथे नगर प्रदक्षिणा झाली अन् पालखीचा मुक्काम झाला. त्यानंतर सोमवारी सकाळी टाळ-मृदंगाच्या गजरात भजनी दिंडीने हा पालखी सोहळा पंढरपूरकडे रवाना झाला. रस्त्याने सवड येथे पालखीचे स्वागत करून वारकर्यांच्या भोजनाची व्यवस्था थोरात कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आली. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. नंतर ही पालखी पाचला हिंगोली शहरात दाखल झाली. येथील नांदेड नाक्यावर पालखी येताच ढोल ताशांचा गजर व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा रेखा बांगर, गटनेते श्रीराम बांगर, गोदावरीबाई बांगर, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, प्रभारी मुख्याधिकारी अश्विनकुमार माने, नगरसेवक गणेश बांगर, उमेश गुठ्ठे, कपील खंडेलवाल, सुनिता बांगर, डॉ.सुरभी चौधरी, विशाल गोटरे, उमेश बांगर, रविंद्र वाढे, नितीन बांगर,भरत पहेलवान चौधरी, रत्नाकर बांगर, सुमीत कांबळे, कैलास शहाणे, साद अहेमद, अशोक नाईक, चंद्रकांत लव्हाळे, अक्षय लव्हाळे, यश लव्हाळे, अनिकेत लव्हाळे, रामकिशन बांगर, मनोज आखरे, सुरेशअप्पा सराफ, दिंडी चालक बळीराम सोळंके, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, द्वारकादास सारडा, मंगेश महाराज, रमेश महाराज यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व मान्यवरांची उपस्थिती होती.
शहरात पालखी (Saint Namdev Palkhi) मार्गावर विविध रंगीबेरंगी आकर्षक रांगोळी काढण्यात आल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी शहरातील तसेच बाहेर ठिकाणच्या भाविक भक्तांनी पालखी दर्शनासाठी गर्दी केली. या सोहळ्याला विदर्भ, मराठवाड्यातील हजारो भाविक उपस्थित होते. पालखी सोबत ४०० वारकरी तसेच काही डॉक्टर व इतर मदतनीस आहेत पालखीतील व इतर दिंडीतील वारकर्यांसाठी औषधोपचार केला जातो. पायदळ वारीसोबत पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली.