Maharajasva Samadhan Camp: नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ए. के. संभाजी मंगल कार्यालय येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान' नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद
३,६५८ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; ९३२ लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ, २,७५८ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी
नांदेड (Maharajasva Samadhan Camp) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार व जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ए. के. संभाजी मंगल कार्यालय येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान' नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या संपन्न झाले.
नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि सेवा 'एकाच छताखाली, एकाच दिवशी' उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या अभियानात विविध शासकीय विभागांनी माहिती, मार्गदर्शन, अर्ज स्वीकृती, प्रमाणपत्रांचे वितरण तसेच विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ उपलब्ध करून दिला.
या (Maharajasva Samadhan Camp) अभियानात महसूल, पुरवठा, कृषी, भूमी अभिलेख, आरोग्य, पंचायत समिती, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान, सायबर सेल, भरोसा सेल, रेशीम विभाग, महावितरण, पशुसंवर्धन, परिवहन, जिल्हा उद्योग केंद्र, प्रधानमंत्री स्वनिधी योजना आदी विभागांनी सक्रिय सहभाग घेत नागरिकांना विविध सेवांचा लाभ उपलब्ध करून दिला.

शिबिराला ३,६५८ नागरिकांनी भेट देऊन जिवंत सातबारा, महिला शेतकरी प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस, उत्पन्न, जात, नॉन-क्रिमिलिअर, भूमिहीन, रहिवासी प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू दाखले, रेशन कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, लेक लाडकी योजना, लखपती दीदी योजना, बचत गट कर्जवाटप, स्वामित्व योजना, कृषी योजनांसह विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ घेतला.
यावेळी ९३२ पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आला. तसेच डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी यांच्या सहकार्याने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात २,७५८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याशिवाय आयोजित रक्तदान शिबिरातही अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. या अभियानातून शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, त्यांच्या समस्या तातडीने सोडविणे आणि प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करणे हा उद्देश यशस्वीपणे साध्य झाला.
कार्यक्रमास महापौर कविता मुळे, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व हजारो नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मुरलीधर हंबर्डे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार, संजय नागमवाड, सुनील माचेवाड यांच्यासह महसूल, पंचायत, कृषी, आरोग्य व इतर विभागातील अधिकारी-कर्मचारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि नांदेड तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.