MLA Shweta Mahale Patil: चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्वेता महाले पाटील यांनी जून 1 रोजी आयोजित 'जनता दरबार'मध्ये महसूल, पंचायत, नगरपालिका विभागांशी संबंधित 307 तक्रारी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आमदारांचे फोनवरून अभिनंदन; म्हणाले "महाराष्ट्रातील पहिल्या आमदार!"
चिखली (MLA Shweta Mahale Patil) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सरकार नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे' या सुशासन मंत्राला मूर्त रूप देणारा 'जनता दरबार' सोमवारी, दि. 1 जून रोजी तहसील कार्यालय, चिखली येथे यशस्वीपणे पार पडला. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मा श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांच्या पुढाकाराने आयोजित या दरबारात महसूल, पंचायत समिती आणि नगरपालिका या तीन प्रमुख विभागांशी संबंधित जवळपास 307 तक्रारींची नोंदणी करण्यात आली. यातील बहुसंख्य तक्रारींचा जागेवरच निपटारा झाला, तर उर्वरित तक्रारी पुढील जनता दरबारापर्यंत निकाली काढण्याचे कडक आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
या जनता दरबारात नागरिकांनी महसूल विभागाशी संबंधित सातबारा उताऱ्यातील त्रुटी, जमीन नोंदी, फेरफार नोंदणी अशा दीर्घकाळापासून प्रलंबित तक्रारी थेट आमदारांसमोर मांडल्या. पंचायत समितीतील प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल) अंतर्गत लाभापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांच्याही मोठ्या संख्येने तक्रारी दाखल झाल्या. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेंतर्गत थकीत लाभ व नूतनीकरणातील अडचणींबाबत अनेक वृद्ध लाभार्थ्यांनी गाऱ्हाणी मांडली. नगरपालिकेशी संबंधित मालमत्ता कर, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती व कचरा व्यवस्थापनाच्या तक्रारीही दाखल झाल्या.

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेसंदर्भातही मोठ्या संख्येने तक्रारी आल्या. काही हप्ते मिळाल्यानंतर लाभ अचानक बंद झाल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. आमदार श्वेता महाले पाटील यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, पात्र प्रत्येक लाभार्थ्याला योजनेचा लाभ अखंडितपणे मिळेल याची खातरजमा करावी आणि बंद झालेली प्रकरणे तातडीने तपासून पुन्हा सुरू करावीत.
या जनता दरबाराला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांना फोनवर व्हिडीओ कॉल करून अभिनंदन केले. "जनतेच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी अशा प्रकारे यंत्रणेकडून काम करून घेणाऱ्या श्वेता महाले पाटील या महाराष्ट्रातील पहिल्या आमदार आहेत" असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) म्हणाल्या, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जे स्वच्छ व गतिशील प्रशासन उभे राहत आहे, त्याचाच एक भाग म्हणून हा जनता दरबार दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी नियमितपणे भरणार आहे. आज 307 तक्रारींपैकी बहुतांश जागेवरच सुटल्या — हा जनतेचा विजय आहे. उर्वरित तक्रारी पुढील दरबारापूर्वी निकाली काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत."

अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा
"अधिकाऱ्यांनी उदासीन राहणे परवडणार नाही, जनतेची सेवा हीच आपली खरी जबाबदारी आहे" — असे ठणकावून सांगत त्यांनी जुलै महिन्यातील पुढील जनता दरबाराची कठोर मुदतही घालून दिली.
यावेळी पंडितदादा देशमुख नगराध्यक्ष, सागर पुरोहित शहराध्यक्ष भाजप, डॉ कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष भाजप,अमोल साठे मंडळ अध्यक्ष, विलास घोलप शिवसेना शहर प्रमुख,तहसीलदार विजय सवडे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी गजानन पोफळे, चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे तसेच महसूल, पंचायत समिती व नगरपालिकेतील विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.