Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > महाराष्ट्र

Flood Alert

मराठवाड्यात पावसाचे दमदार पुनरागमन; जालन्यात रेड अलर्ट, विदर्भात पूरस्थितीने जनजीवन विस्कळीत

राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.


मराठवाड्यात पावसाचे दमदार पुनरागमन जालन्यात रेड अलर्ट विदर्भात पूरस्थितीने जनजीवन विस्कळीत

Flood Alert |

जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस; मेळघाटात 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला, गडचिरोलीत 18 प्रमुख मार्ग बंद

जालना : राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रात धरणे भरल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता कमी झाली असली, तरी मराठवाड्यात पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना जालन्यात झालेल्या दमदार पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने जालना जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांवर ताण वाढला होता. मात्र, गुरुवारी जालना, बदनापूर, अंबड, मंठा, घनसावंगी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून उघडीपामुळे निर्माण झालेला ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

दुसरीकडे, हवामान विभागाने 30 आणि 31 जुलै रोजी विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाची नोंद झाली असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मेळघाटात पूरस्थिती; 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात धारणी तालुक्यात दिवसभर आणि रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे सिपना नदीला पूर आला आहे. नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने 20 ते 25 गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. याशिवाय, पूर्णा प्रकल्पातील पाणीसाठा वाढल्यामुळे धरणाचे तीन दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. परिणामी शिरजगाव कसबा येथील मेघा नदीला पूर आला असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

भंडाऱ्यात ऑरेंज अलर्टनंतर मुसळधार पाऊस

भंडारा जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. सकाळी कडक ऊन असतानाच दुपारी अचानक वातावरणात बदल झाला आणि जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तुमसरमध्ये सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला, त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. सलग पाचव्या दिवशी भंडारा, तुमसर, मोहाडी, साकोली, लाखांदूर, लाखनी आणि पवनी तालुक्यांमध्येही पावसाची जोरदार नोंद झाली.

गडचिरोलीत अनेक मार्ग पाण्याखाली

गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सिरोंचा तालुक्यातील कोटापल्ली पुलावरून पाणी वाहत असल्याने चार गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. आलापल्ली शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून येथील पेट्रोल पंपालाही पाण्याचा फटका बसला आहे.

पूरामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर वाहतूक ठप्प झाली आहे. आज सकाळी 11 वाजेपर्यंत तब्बल 18 प्रमुख मार्ग बंद होते. गडचिरोली-धानोरा राष्ट्रीय महामार्गावरील रांगी नाला, आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील मोसम आणि टेकमपल्ली नाले तसेच आष्टी-आलापल्ली मार्गावरील दीना नदीवरील पुलांवरून पाणी वाहत आहे. एटापल्ली, अहेरी, मुलचेरा, धानोरा, कोरची, कुरखेडा, चामोर्शी आणि आरमोरी तालुक्यांतील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून नागरिकांनी पूरग्रस्त मार्गांवरून प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related to this topic: