Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > महाराष्ट्र

Ethanol Blended Fuel

E20 पेट्रोलवर केंद्राची महत्त्वाची कबुली; जुन्या BS-3 वाहनांमध्ये काही रबर भाग बदलावे लागू शकतात

ई-20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोलच्या वापराबाबत केंद्र सरकारने प्रथमच महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे.


e20 पेट्रोलवर केंद्राची महत्त्वाची कबुली जुन्या bs-3 वाहनांमध्ये काही रबर भाग बदलावे लागू शकतात

राज्यसभेत नितीन गडकरी यांची माहिती; इंजिनमध्ये बदलाची गरज नसल्याचा दावा, नियमित सर्व्हिसिंगमध्ये आवश्यक भाग बदलण्याचा सल्ला

ई-20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोलच्या वापराबाबत केंद्र सरकारने प्रथमच महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे सांगितले की, ई-20 इंधनामुळे काही जुन्या बीएस-3 वाहनांमधील विशिष्ट रबरचे भाग आणि गॅस्केट बदलण्याची गरज भासू शकते. मात्र, या इंधनामुळे वाहनाच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गडकरी यांच्या माहितीनुसार, 2005 ते 2016 या कालावधीत उत्पादित झालेल्या आणि बीएस-3 मानकांनुसार तयार करण्यात आलेल्या काही वाहनांमध्ये अशा प्रकारचा परिणाम दिसू शकतो. संबंधित रबरचे भाग नियमित सर्व्हिसिंगदरम्यान सहज बदलता येतात, असेही त्यांनी नमूद केले.

ई-20 इंधनाच्या परिणामांचा अभ्यास इंडियन ऑइल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यांनी दुचाकी व चारचाकी वाहनांवर केला होता. या अभ्यासात वाहनांच्या एकूण कार्यक्षमतेवर किंवा टिकाऊपणावर ई-20 मुळे कोणताही लक्षणीय विपरीत परिणाम होत नसल्याचे निष्कर्ष समोर आल्याचे गडकरी यांनी सांगितले.

मायलेजच्या मुद्द्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. वाहनाचा इंधन वापर आणि मायलेज हे केवळ इंधनाच्या प्रकारावर अवलंबून नसून चालकाची वाहन चालवण्याची पद्धत, रस्त्यांची स्थिती, वाहनाची देखभाल आणि इतर अनेक घटक त्यावर परिणाम करतात, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच इथेनॉल मिश्रित इंधनाचा वापर जगभरात शंभर वर्षांहून अधिक काळापासून केला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कोणते भाग बदलावे लागू शकतात?

ई-20 पेट्रोलच्या दीर्घकालीन वापरामुळे काही जुन्या वाहनांमधील फ्युएल पाईप्स, ओ-रिंग्ज, रबर सील्स, फ्युएल होसेस, गॅस्केट्स, फ्युएल पंपातील रबरी घटक आणि इंजेक्टर सील्स यांसारख्या भागांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

हे भाग इंजिनमध्ये असतात का?

नाही. प्रभावित होण्याची शक्यता असलेले बहुतांश रबरचे भाग हे इंजिनमध्ये नसून फ्युएल सिस्टीमचा भाग असतात.

कोणत्या वाहनांवर परिणाम होऊ शकतो?

युरो-4 पेक्षा कमी उत्सर्जन मानकांच्या वाहनांमध्ये काही भाग बदलण्याची गरज लागू शकते. संसदेत सादर केलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2005 पासून लागू झालेल्या बीएस-3 मानकांअंतर्गत 2016 पूर्वी उत्पादित अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने येतात.

भाग बदलण्याचा खर्च किती?

हा खर्च वाहनाच्या कंपनी आणि मॉडेलनुसार बदलू शकतो. मर्सिडीज-बेंझसारख्या लक्झरी वाहनांमध्ये खर्च अधिक असू शकतो, तर मारुतीसारख्या वाहनांमध्ये तो तुलनेने कमी राहू शकतो. साधारणपणे दुचाकींसाठी 500 ते 1,500 रुपये, तर चारचाकींसाठी 2,000 ते 8,000 रुपयांपर्यंत खर्च येण्याची शक्यता आहे.

भाग किती वेळाने बदलावे लागतील?

यासाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा किंवा किलोमीटरची अट नाही. नियमित तपासणीदरम्यान झीज, गळती किंवा दोष आढळल्यास संबंधित भाग बदलण्याचा सल्ला दिला जातो.

रबरचे भागच का प्रभावित होतात?

पूर्वी वापरण्यात आलेले काही रबर साहित्य इथेनॉलच्या दीर्घकालीन संपर्कासाठी तयार केलेले नव्हते. त्यामुळे कालांतराने ते कडक होणे, मऊ पडणे किंवा फुगणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

धातूच्या भागांवरही परिणाम होतो का?

संसदेत सादर केलेल्या माहितीनुसार, परिणाम प्रामुख्याने रबरच्या भागांवर मर्यादित असतो. मात्र, युरो-4 आणि त्यापेक्षा कमी दर्जाच्या वाहनांतील काही धातूच्या भागांवरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

समस्या किती दिवसांनी दिसू शकते?

वाहन नियमितपणे वापरले जात असल्यास तातडीने कोणतीही अडचण निर्माण होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, अशा वाहनांची देखभाल आणि तपासणी अधिक काळजीपूर्वक करावी लागेल.

कार आणि दुचाकींवर परिणाम समान असेल का?

दुचाकी आणि चारचाकी दोन्ही प्रकारच्या वाहनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याची तीव्रता संबंधित वाहनाची रचना आणि त्यातील फ्युएल सिस्टीमवर अवलंबून असेल.

Related to this topic: