उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारचे मानले आभार
हिंगोली (MLA Santosh Bangar) : महाराष्ट्रासह हिंगोली जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले असताना दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी व इतर शैक्षणिक परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी कळमनुरीचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी केली होती. या मागणीला अखेर यश आले असून सरकारने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांचे व महायुती सरकारचे जाहीर आभार मानले आहेत.
आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी सातत्याने दुष्काळग्रस्त शेतकरी व विद्यार्थ्यांचे प्रश्न शासन दरबारी लावून धरले होते. हिंगोली जिल्ह्यासह राज्यात पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले असताना विद्यार्थ्यांना परीक्षा फी भरणे कठीण होत होते. ही बाब लक्षात घेऊन आमदार बांगर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले होते आणि विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी केली होती.
सरकारने या मागणीची दखल घेत दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी आमदार संतोष बांगर यांनी सांगितले की, महायुती सरकार हे सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे सरकार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नेहमीच जनतेच्या पाठीशी उभे राहतात.