National Highway Accident: १ ऑगस्ट रोजी पानकनेरगाव येथे दोन तरुणांचा (सुजित बांगर व नितीन बांगर) राष्ट्रीय महामार्गावर होऊन मृत्यू झाला. अपघातमुळे शोकाची कळा गावात पसरली,
पानकनेरगाव येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू
सेनगाव (National Highway Accident) : पानकनेरगांव सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील दोन तरुणांचा दि. १ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८.०० ते ८.३० वाजण्याच्या दरम्यान सेनगाव–रिसोड राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे पानकनेरगाव परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेनगाव–रिसोड राष्ट्रीय महामार्गावरील पोद्दार शाळेजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव मोटारसायकल जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, मोटारसायकलस्वार सुजित कैलास बांगर (वय अंदाजे २६ वर्षे) व नितीन सुरेश बांगर (वय अंदाजे २५ वर्षे) या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह पुढील वैद्यकीय व कायदेशीर कार्यवाहीसाठी सेनगाव ग्रामीण रुग्णालयात हलविले. या (National Highway Accident) प्रकरणाचा पुढील तपास सेनगाव पोलीस करीत आहेत.
दरम्यान, सेनगाव–रिसोड राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व नूतनीकरण झाल्यानंतर या मार्गावरील वाहनांचा वेग आणि वाहतुकीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भरधाव वाहनचालना, निष्काळजीपणा तसेच रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. या मार्गावर वेगमर्यादेची काटेकोर अंमलबजावणी, आवश्यक ठिकाणी इशारा फलक, रात्रीच्या वेळी परावर्तित (रिफ्लेक्टर) चिन्हे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सुजित कैलास बांगर आणि नितीन सुरेश बांगर यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण पानकनेरगाव गावावर शोककळा पसरली आहे. दोघेही तरुण, होतकरू आणि सर्वपरिचित असल्याने त्यांच्या निधनाने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून परिसरातील नागरिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे