Breaking News
  • अमरावती जिल्ह्यातील आजपासून शाळा सकाळच्या सत्रात
  • मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाणीच पाणी
  • समृद्धी महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट, समृद्धी महामार्गावर काही वेळासाठी वाहतूक ठप्प
  • सिया गोयल हिचे तिच्या मैत्रीणसोबतचे चॅट व्हायरल
  • पुण्यातील कोंढवा परिसरात मोठी वाहतूक कोंडी
  • पुणे-सोलापूर महामार्गावर टेम्पोला आग
  • अंबरनाथ पूर्वेतील पार्किंगच्या ठेकेदारांचे ठेके रद्द!
  • शेतीत काम करणारी 'महिला' आता 'शेतकरी': आ. श्वेता महाले पाटील
  • E20: 'सरकारचे प्रयोग, जनतेची परीक्षा?'

होम > क्राईम जगत

Ketan Agrawal Case

Ketan Agrawal Case : डिलीट चॅट्स रिकव्हर; सिया-चेतनच्या 'कोडवर्ड'चा उलगडा करण्याचे पोलिसांसमोर आव्हान

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात दररोज नवे तपशील समोर येत आहे.


ketan agrawal case  डिलीट चॅट्स रिकव्हर सिया-चेतनच्या कोडवर्डचा उलगडा करण्याचे पोलिसांसमोर आव्हान

Ketan Agrawal Case |

पुणे (Deleted Chats) : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात दररोज नवे तपशील समोर येत असून, मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी गुन्ह्याचे नियोजन अत्यंत गुप्त पद्धतीने केल्याचे तपासातून पुढे आले आहे. दोघांच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा पुणे ग्रामीण पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा मिळवला असून, त्यामधील सांकेतिक शब्द आणि टोपणनावांचा अर्थ शोधण्याचे काम सध्या सुरू आहे.

तपासादरम्यान सिया गोयलच्या एका चॅटनेही पोलिसांचे लक्ष वेधले आहे. केतनशी लग्न होणार नसतानाही कोणालाही संशय येऊ नये म्हणून विमान प्रवासाचे नियोजन करण्यात आले होते का, याची चौकशी सुरू आहे. याच संदर्भात सियाने तिच्या एका मैत्रिणीकडे आधार कार्डचा फोटो मागितल्याचे स्नॅपचॅटवरील संभाषण समोर आले आहे. "जे लग्न होणार नाही, त्या लग्नासाठी तुझे आधार कार्ड पाठव," असा संदेश त्या चॅटमध्ये असल्याचे समोर आले आहे. हा संवाद गुन्ह्यानंतर दिशाभूल करण्याच्या योजनेचा भाग होता का, याची पोलीस पडताळणी करत आहेत.

दरम्यान, मोबाईलमधून रिकव्हर करण्यात आलेल्या डेटामध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी 'कोडवर्ड' आणि 'निकनेम' वापरून संवाद साधल्याचे उघड झाले आहे. या संभाषणाचा नेमका संदर्भ आणि त्याचा हत्येच्या कटाशी संबंध काय, हे समजून घेण्यासाठी दोन्ही आरोपींची समोरासमोर चौकशी आवश्यक असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले.

सरकारी वकील राजश्री वीरकुड यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना या सांकेतिक संभाषणाचा अर्थ उलगडण्यासाठी पोलिस कोठडीची आवश्यकता असल्याचे सांगितले. मात्र, बचाव पक्षाचे वकील विपुल दुशिंग यांनी याला विरोध करत तांत्रिक तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयासमोर मांडले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवले.

या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक झाला असून, सिया आणि चेतन यांच्या संपर्कातील अनेक मित्र-मैत्रिणी तसेच इतर तरुणांचे जबाब पुणे ग्रामीण पोलिस नोंदवत आहेत. रिकव्हर करण्यात आलेल्या चॅट्सची पडताळणी सुरू असताना या दोघांच्या निकटवर्तीयांकडून आणखी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

तपासादरम्यान चेतन चौधरीच्या मूळ बीड येथील एका वर्गमित्राची माहितीही समोर आली आहे. मे महिन्याच्या अखेरीपासून तो चेतनच्या सातत्याने संपर्कात होता. तपासानुसार, त्याला संपूर्ण कटाची माहिती होती. मात्र, त्याने या दोघांना केतनचा जीव घेण्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असा सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे.

सुनावणीदरम्यान आरोपींच्या नार्को विश्लेषण चाचणीचाही मुद्दा उपस्थित झाला. मात्र, आरोपींच्या संमतीशिवाय अशी चाचणी घेता येत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर सरकारी पक्षानेही सध्या त्या चाचणीची तातडीची गरज नसल्याचे सांगितल्याने हा विषय तूर्तास बाजूला ठेवण्यात आला.

तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी सिया गोयलच्या घरातून तिचा एक वर्ष जुना मोबाईल जप्त केला आहे. सिया आणि चेतन यांची ओळख दिवाळी पार्टीदरम्यान झाल्याची माहिती तपासात समोर आली असून, या जुन्या मोबाईलमधूनही तपासाला महत्त्वाची माहिती मिळू शकते का, याचा शोध घेतला जात आहे.

रिकव्हर करण्यात आलेल्या चॅट्समधील सांकेतिक शब्दांचा अर्थ शोधण्यासाठी फॉरेन्सिक आणि सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. हे कोडवर्ड हत्येच्या कटाशी कसे संबंधित आहेत, याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

पोलिस कोठडीदरम्यान तपास पथकाने अनेक महत्त्वाच्या बाबींची पडताळणी केली. आरोपींना विविध घटनास्थळी नेऊन तपास करण्यात आला. लुल्लानगर येथील टेकडीवर हत्येच्या सरावस्थळाची पाहणी करण्यात आली. लोहगडावर स्वतंत्रपणे सीन रिक्रिएशन करण्यात आले तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघांनी एकमेकांना कशा प्रकारे खुणा केल्या याची चौकशी झाली. याशिवाय ३१ मे, ४ जून आणि १४ जून रोजीही केतन अग्रवाल यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता का, याची पडताळणी करण्यात आली.

तपासादरम्यान पुणे-मुंबई महामार्गावरील फूड मॉलमध्ये जाऊन केतनचा पासपोर्ट शोधण्याचाही प्रयत्न करण्यात आला. नव्या साक्षीदारांचे जबाब नोंदवून त्यांची आरोपींसमोर चौकशी करण्यात आली. हत्येपूर्वी लोहगडाची किती वेळा रेकी करण्यात आली, या कटासाठी दोघे किती वेळा भेटले, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. याशिवाय हत्येच्या दिवशी सिया गोयलने वापरलेले कपडे, बूट, बॅग तसेच चेतन चौधरीची हुडी आणि पॅन्टही पोलिसांनी जप्त केली आहे.

Related to this topic: