Risod Bazar Samiti: रिसोड बाजार समितीत हळदीच्या आवकीने विक्रमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
योग्य भाव आणि पारदर्शक व्यवहार
रिसोड (Risod Bazar Samiti) : हळदीच्या हंगामात रिसोड बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर आवक होत असतानाही, सभापती आणि सचिव व संचालक मंडळाने केलेले चोख नियोजन महत्त्वाचे ठरले. शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी लिलाव प्रक्रियेत सुसूत्रता आणली गेली. रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 16 एप्रिल रोजी हळदीच्या दराने उच्चांक गाठत १५ हजार रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. नव्या हंगामातील हळदीची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने बाजार समिती परिसर सकाळपासूनच गजबजलेला होता.
रिसोड तालुक्यात यंदा हळदीचे क्षेत्र सर्वाधिक होते. नवीन हळद विक्रीसाठी बाजार समितीत येत आहे. 16 एप्रिल रोजी रिसोड बाजार समितीत प्रथमच मोठ्या प्रमाणात हळदीची आवक झाली. सुमारे ९ हजार क्विंटल (Risod Bazar Samiti) हळद बाजारात दाखल झाल्याने दराबाबत शेतकऱ्यांमध्ये सुरुवातीला संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, प्रत्यक्ष लिलावात व्यापाऱ्यांकडून चांगली बोली लागत १३ हजार ते १५ हजार २५० रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा विश्वास वाढला.
बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी सकाळी ६ वाजतापासूनच बाजार समितीत उपस्थित राहून शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला आपला माल परत नेण्याची वेळ आली नाही. (Risod Bazar Samiti) बाजार समितीत हळदीला मिळणारे स्पर्धात्मक भाव हे मुख्य आकर्षण ठरले आहे. इतर बाजारपेठांच्या तुलनेत रिसोडमध्ये व्यापाऱ्यांची संख्या आणि चढाओढ वाढल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळत आहे. गुरूवारी मोठ्या प्रमाणात हळदीची आवक झाल्यामुळे लिलाव व मोजणीचे काम दोन दिवस चालणार आहे.
शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू असून, त्यांच्या घामाला योग्य दाम मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे. आवक कितीही मोठी असली तरी व्यवस्थापन कोलमडणार नाही, याची आम्ही दक्षता घेतली आहे." व्यापाऱ्यांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- विष्णुपंत भुतेकर, सभापती, बाजार समिती, रिसोड
बाजार समितीत हळदची आवक मोठ्या प्रमाणावर होती. त्यामुळे आज आणि उद्या हळदीचा लिलाव आणि मोजणी होणार आहे.
- विजय देशमुख, सचिव, बाजार समिती, रिसोड