Farmer Loan Waiver List: राज्य शासनाने 2 लाख रुपयांपर्यंतचे शेतकरी कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार याद्या प्रसिद्ध देखील झाल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात बँकेची मुद्दल रक्कम, माफीच्या यादी
शेलसुर स्टेट बँकेत शेतकऱ्यांसह क्रांतीकारी संघटनेचे विनायक सरनाईक, नितिन राजपुत यांचा बॅक व्यवस्थापकास घेराव...
चिखली (Farmer Loan Waiver List) : राज्य शासनाने 2 लाख रुपयांपर्यंतचे शेतकरी कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार याद्या प्रसिद्ध देखील झाल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात बँकेची मुद्दल रक्कम, माफीच्या यादीतील रक्कम आणि KYC केल्यानंतरची रक्कम यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर दि०३/०८/२०२६रोजी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, नितीन राजपूत, संतोष शेळके,अरुण नेमाने,यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी शेलसुर येथील स्टेट बँक शाखा व्यवस्थापक यांना घेराव घालून जाब विचारला.
बँकेतील मुद्दल, माफीची रक्कम आणि KYC नंतरच्या रक्कमेतील तफावतीची सविस्तर यादी तात्काळ प्रसिद्ध करावी, 2 लाखाच्या आतील कर्ज असलेल्या सर्व शेतकऱ्यांचे CIBIL स्कोर खराब होणार नाही याची लेखी हमी बँक प्रशासनाने द्यावी आणि शासनाने जाहीर केलेली हेअरकटची रक्कम OTS च्या माध्यमातून कमी करून न भरता सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी,ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केली त्या शेतकऱ्यांची रक्कम खात्यावर वर्ग करुण त्यांना नव्याने पिक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे,अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सरकार एकीकडे 2 लाखापर्यंत कर्जमाफी म्हणते, पण दुसरीकडे बँका ही रक्कम वन टाईम सेटलमेंट मधून भरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे CIBIL खराब होणार आहे. जर शेतकऱ्यांचे CIBIL खराब झाले तर त्याला जबाबदार कोण असा सवाल यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला. CIBIL खराब झाल्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांना शिक्षण कर्ज, गृह कर्ज तसेच इतर कोणतेही बँक कर्ज मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा सावकाराच्या दारी जाईल. ही कर्जमाफी नसून शेतकऱ्यांची फसवणूक आहे असा आरोप विनायक सरनाईक यांच्यासह यादीमध्ये तफावत असलेल्या शेतकऱ्यांनी केला आहे. मागण्यांची पूर्तता होऊन न्याय न मिळाल्यास नाही क्रांतीकारी शेतकरी संघटना शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.यावेळी रविंद्र अन्ना काळे,सतिष घाडगे, अंकुश घाडगे, नितिन चव्हाण, शिवशंकर घाडगे,पवन भाकरे,नेताजी कापसे, शिवाजी घाडगे,लक्ष्मण रींढे,हरीदास नेमाने,कैलास घाडगे, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणींची जबाबदारी शासनाने घ्यावी- सरनाईक
शासन जर 2 लाखांपर्यंत सरसगट कर्ज माफ झाले असे सांगत असेल आणि दुसरीकडे तफावतीतील वरची रक्कम बँका भरणार आहेत असे सांगत असेल, तर याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे. तफावत असणाऱ्या शेतकऱ्यांची वरची रक्कम जरी बँका हेअरकट माध्यमातून भरत असल्या तरी तो शेतकरी OTS मध्ये जात असल्याने त्यांचे CIBIL खराब होणार आहे. त्यामुळे पिक कर्जाव्यतिरिक्त भविष्यात मुलांसाठी शैक्षणिक, गृह व इतर कर्जासाठी अडचणी निर्माण होणार आहेत. यामुळे या शेतकऱ्यांना उद्या कर्ज उपलब्ध करूण देण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी व तसे आदेश संबंधित बॅकांना काढण्यात यावा अशी मागणी देखील विनायक सरनाईक यांनी यावेळी बोलताना केली.