मानोरा (Drought-Affected Farmland) : शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीमध्ये मानोरा तालुक्याचा समावेश असुन दि. १ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील अभयखेडा शिवारात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत खरीप पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे महसूल व कृषी विभागाच्या पथकांच्या वतीने करण्यात आले.
मानोरा तालुक्यात खरीप हंगामात सुमारे अंदाजे ४० हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली असून, त्या क्षेत्रातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात येणार आहेत. याच अनुषंगाने अभयखेडा येथील शेतकरी प्रवीण राऊत, महेश राऊत यांच्यासह परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या शेतातील पावसाअभावी करपलेल्या खरीप पिकांची नुकसानीची पाहणी व पंचनामा तलाठी ए. आर. मनवर, कृषी सहाय्यक महेंद्र तुनगर यांनी केली.
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद व्हावी, कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये आणि शासनाला अचूक माहिती उपलब्ध व्हावी, या (Drought-Affected Farmland) दृष्टीने महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाच्या समन्वयातून ही कार्यवाही राबविण्यात येत आहे. शेतीपिकांचे पंचनामे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांच्यामार्फत संयुक्तरित्या करण्यात येत असल्याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीने विचारले असता तहसीलदार राजेंद्र पाटील यांनी दिली.