दुष्काळग्रस्त पिक पंचनामा

दुष्काळग्रस्त पिकांचे संयुक्त पंचनामे युद्धपातळीवर

Drought-Affected Crops: खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेती पिके, बागायत तसेच फळबागांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ व शेतकरीनिहाय पंचनामे तातडीने करण्याचे आदेश

दुष्काळग्रस्त पिकांचे संयुक्त पंचनामे युद्धपातळीवर

Drought-Affected Crops

चिखली तालुक्यात महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाचे संयुक्त पथक
३ ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश

चिखली (Drought-Affected Crops) : खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेती पिके, बागायत तसेच फळबागांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ व शेतकरीनिहाय पंचनामे तातडीने करण्याचे आदेश महसूल प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार चिखली तालुक्यात पंचनाम्यांची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात आली असून, नुकसानीचे अचूक मूल्यांकन करून पात्र शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या शासन निर्णयानुसार तसेच जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या निर्देशानुसार ही पंचनामे प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रत्येक गावातील बाधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीची नोंद करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) आणि सहायक कृषी अधिकारी यांचे संयुक्त पथक नियुक्त करण्यात आले आहे.

पंचनामे करताना नुकसानीची नोंद पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने व्हावी, यासाठी संबंधित पथकांना शेतातील नुकसानीचे जिओ-टॅग फोटो घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नुकसानीचे ठिकाण, पिकाची स्थिती आणि बाधित क्षेत्र याची अधिकृत नोंद उपलब्ध होणार आहे. प्रत्येक बाधित शेतकऱ्याचा स्वतंत्र अहवाल विहित नमुन्यात तयार करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यामध्ये आवश्यक माहिती Excel Sheet तसेच अ, ब, क, ड प्रपत्रांमध्ये सादर करावी लागणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी सॉफ्ट कॉपी ई-मेलद्वारे, तर स्वाक्षरीसह हार्ड कॉपी तहसील कार्यालयात ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत विनाविलंब सादर करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

चिखली तालुक्यातील चिखली, हातणी, धोडप, उदयनगर, अमडापूर, पेठ, एकलारा, चांधई, कोलारा, मेरा खुर्द आणि शेलगांव अटोळ या ११ महसूल मंडळांतील मंडळ अधिकाऱ्यांवरही या कामकाजाची देखरेख करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अधिनस्त गावांमध्ये सुरू असलेल्या पंचनाम्यांचा दैनंदिन आढावा घेऊन विहित नमुन्यातील माहिती वेळेत तहसील कार्यालयास सादर करण्याची वैयक्तिक दक्षता घेण्याचे निर्देश मंडळ अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

दुष्काळामुळे खरीप पिकांचे (Drought-Affected Crops) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी पंचनाम्यांची अचूकता आणि वेळेत अहवाल सादर होणे महत्त्वाचे आहे. या कामात कोणतीही हयगय होऊ नये, तसेच बाधित शेतकऱ्यांची माहिती योग्य पद्धतीने नोंदविली जावी, याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. “बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून शासनाच्या निकषानुसार मदत मिळवून देण्यासाठी पंचनामे प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येत आहे. संबंधित यंत्रणांनी वेळेत आणि अचूक माहिती सादर करावी,” असे तहसीलदार विजय सवडे यांनी स्पष्ट केलेआहे.

टैग्स: DroughtAffected Crops