राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली.
जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनानंतर संसदेतील पंतप्रधान कार्यालयात झाली बैठक; भेटीमागील कारणाबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना वेग
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली. या भेटीचे छायाचित्र समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, या बैठकीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. या बैठकीत सीजेपीच्या आंदोलनाशी संबंधित मुद्दा शरद पवार यांनी पंतप्रधानांसमोर मांडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच देशभरात गाजत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांवर कोणत्या उपाययोजना करता येतील, यावरही तिघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
शरद पवार यांनी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने या भेटीबाबत विविध राजकीय तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्यामुळे तिचे राजकीय महत्त्व अधिक वाढल्याची चर्चा आहे.
यापूर्वी मंगळवारी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जंतर-मंतर येथे जाऊन अभिजीत दिपके तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर अवघ्या एका दिवसात पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या बैठकीमुळे या घडामोडींना नवे राजकीय संदर्भ प्राप्त झाले असून, या भेटीबाबत आता सर्व स्तरांत चर्चा रंगू लागली आहे.