सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कच्च्या मालाच्या वाढत्या खर्चाचा कंपन्यांवर परिणाम; हिंदुस्तान युनिलिव्हर, डोडला डेअरी, एशियन पेंट्ससह अनेक कंपन्या दरवाढीच्या तयारीत
नवी दिल्ली : सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाढत्या उत्पादन खर्चामुळे डिटर्जंट, डिशवॉशिंग बार, पेंट, टायर आणि इतर दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती पुढील तिमाहीत वाढू शकतात. अनेक आघाडीच्या कंपन्या उत्पादनांच्या दरवाढीचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
जागतिक स्तरावरील घडामोडींमुळे कच्च्या मालाच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. विशेषतः अमेरिका-इराण संघर्षामुळे मध्यपूर्वेतील तणाव दीर्घकाळ कायम राहिल्याने जागतिक ऊर्जा बाजारावर परिणाम झाला. कच्च्या तेलासह विविध महत्त्वाच्या कच्च्या मालाचे दर वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली असून कंपन्यांवरील आर्थिक दबाव अधिक तीव्र झाला आहे. त्याचा परिणाम ग्राहकांना वाढीव किंमतींच्या स्वरूपात जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अहवालानुसार, हिंदुस्तान युनिलिव्हर डिटर्जंट आणि डिशवॉशिंग बारसारख्या उत्पादनांच्या किंमतीत मर्यादित वाढ करण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर डोडला डेअरी, एशियन पेंट्स आणि इतर अनेक कंपन्याही उत्पादनांच्या किंमती वाढवण्याचा पर्याय विचारात घेत आहेत. त्यामुळे घरगुती वापरातील अनेक वस्तूंचे दर लवकरच वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, देशातील किरकोळ महागाईचा दर जून २०२६ मध्ये ४.३८ टक्क्यांवर पोहोचला असून, मे महिन्यात तो ३.९३ टक्के होता. अन्नधान्य आणि खाद्यपदार्थांच्या महागाईत झालेली वाढही चिंतेची बाब मानली जात आहे. याशिवाय कमी पावसाची शक्यता, ऊर्जा दरांमधील वाढ आणि जागतिक पुरवठा साखळीवरील दबाव यामुळे आगामी महिन्यांत महागाईचा ताण आणखी वाढू शकतो, असे संकेत आहेत.
भारतात ऑगस्ट ते नोव्हेंबर हा प्रमुख सणासुदीचा कालावधी मानला जातो. या काळात ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते आणि अनेक कंपन्यांच्या वार्षिक विक्रीतील महत्त्वाचा वाटा याच हंगामात असतो. त्यामुळे वाढलेल्या मागणीसोबत उत्पादनांच्या किंमती वाढल्यास ग्राहकांच्या खर्चातही लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर ३ ते ५ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीकडे बाजाराचे लक्ष लागले आहे. मागील बैठकीत रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला होता. यावेळीही व्याजदरात मोठा बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र जागतिक कच्च्या तेलाच्या किमती, मान्सूनची स्थिती आणि महागाईचा पुढील कल लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक आगामी धोरण निश्चित करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.