प्रसिद्ध गायक गुरु रंधावा यांच्या फिटनेस सेंटर फ्रँचायझीचा भाग असलेल्या जिमवर बुधवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली (Delhi Gym Firing) : प्रसिद्ध गायक गुरु रंधावा यांच्या फिटनेस सेंटर फ्रँचायझीचा भाग असलेल्या जिमवर बुधवारी रात्री गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील पश्चिम विहार परिसरात असलेल्या '24HS Fitness' जिमवर दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने सोशल मीडियावर पोस्ट करत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे. मात्र, या पोस्टची सत्यता अद्याप पोलिसांकडून पडताळली जात आहे.
गँगचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या अनिल पंडित याने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले की, "गुरु रंधावा हे अभिनेता सलमान खान यांच्या खूप जवळ येत असल्यामुळे त्यांना इशारा देण्यासाठी दिल्लीतील त्यांच्या जिमला लक्ष्य करण्यात आले." तसेच गँगच्या "शत्रूंवर" आणखी हल्ले करण्यात येतील, अशी धमकीही या पोस्टमध्ये देण्यात आली आहे.

गोळीबाराची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित जिम एका स्थानिक व्यावसायिकाकडून गुरु रंधावा यांच्या '24HS Fitness' फ्रँचायझी अंतर्गत चालवली जात होती. चौकशीसाठी जिम मालकाला पोलिसांनी बोलावले आहे.
प्राथमिक तपासात दोन दुचाकीस्वारांनी चेहऱ्यावर कपडा बांधून जिमवर अनेक फेऱ्या झाडल्याचे समोर आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात येत आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण आणि संबंधित आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.
बिश्नोई गँग आणि सलमान खान वादाचे कारण काय?
सलमान खान आणि बिश्नोई गँग यांच्यातील वादाचे मूळ 1998 मधील राजस्थानातील काळवीट (ब्लॅकबक) शिकार प्रकरणात असल्याचे मानले जाते. 'हम साथ साथ हैं' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमान खान आणि त्यांच्या सहकलाकारांवर दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप होता. बिश्नोई समाज काळवीटाला पवित्र मानत असल्याने या प्रकरणानंतर सलमान खान आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींना वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात सैफ अली खान, तब्बू , सोनाली बेंद्रे आणि नीलम यांचीही नावे समोर आली होती. 2018 मध्ये जोधपूर येथील न्यायालयाने सलमान खान यांना दोषी ठरवत पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. नंतर त्यांना जामीन मिळाला होता.
बिश्नोई गँगच्या निशाण्यावर सेलिब्रिटी
2022 मध्ये पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई गँग देशभरात चर्चेत आली. त्यानंतर गिप्पी गरेवाल यांच्या कॅनडातील घरावर हल्ला, मुंबईतील सलमान खान यांच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार, धिल्लोन यांना धमक्या, बाबा सीदिक्की यांच्या हत्येप्रकरणातील आरोप, तसेच परदेशातील अनेक मालमत्तांवर हल्ल्यांच्या घटनांमध्ये गँगचे नाव समोर आले आहे.
याशिवाय विनोदी कलाकार कपिल शर्मा यांच्या कॅनडातील कॅफेला लक्ष्य केल्याचा आरोपही गँगवर आहे. तसेच दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील घराबाहेरील गोळीबाराची जबाबदारीही गँगने स्वीकारल्याचा दावा केला होता. उत्तर प्रदेशातील बरेली येथे अभिनेत्री दिशा पाटणी यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातही गँग सदस्यांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले होते.