(Cockroach Janta Party) देशभरात सध्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party) या नव्या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या 6 दिवसांत या पेजने इन्स्टाग्रामवर तब्बल 13 मिलियन फॉलोअर्स मिळवल्याचा दावा करण्यात आला असून, या वाढीमुळे राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फॉलोअर्सच्या संख्येत कॉकरोच जनता पार्टीने काही प्रमुख राजकीय पक्षांनाही मागे टाकल्याचे सांगितले जात आहे. काही वेळातच काँग्रेसच्या फॉलोअर्सलाही मागे टाकण्याची शक्यता असल्याचे सोशल मीडिया ट्रेंडमधून दिसून येत आहे.
दरम्यान, या चर्चेदरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या पक्षाचे X (ट्विटर) अकाऊंट भारतात बंद करण्यात आले आहे. अचानक मोठी लोकप्रियता मिळाल्यानंतर हे अकाऊंट बंद झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र यामागचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या संदर्भात पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी माहिती देताना सांगितले की, इन्स्टाग्राम अकाऊंटही बंद करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र ते बंद न झाल्याने X अकाऊंट भारतात बंद करण्यात आले.
ते म्हणाले की, “आमची ही चार दिवसांची पार्टी आहे. आम्ही काहीही ठरवून केलेले नाही. ही पार्टी अपघाताने निर्माण झालेली आहे. त्यामुळे सध्या कोणत्याही अंतिम निर्णयापर्यंत पोहोचणे कठीण आहे. आमचे सुमारे 1 कोटी फॉलोअर्स झाले आहेत, त्यामुळे आधी त्यांची मतं जाणून घेऊ.”
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “ही चळवळ मोठी होणार आहे आणि देशाचं राजकारण बदलणार हे नक्की आहे. आम्ही कोणतीही योजना आखून पक्ष स्थापन केलेला नाही. यंत्रणेशी संबंधित प्रश्न आणि लोकशाहीवर प्रश्न उपस्थित करण्यासाठी हा आवाज आहे.”
त्यांच्या म्हणण्यानुसार, “सरन्यायाधीशांच्या वक्तव्यामुळे ही चर्चा सुरू झाली. सरकार आणि यंत्रणा यांच्यावर प्रश्न विचारणे हे आमचे उद्दिष्ट आहे. लोकशाहीचा उलटा प्रवास सुरू आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
सध्या सोशल मीडियावर या नव्या ‘कॉकरोच जनता पार्टी’बाबत जोरदार चर्चा सुरू असून, हा ट्रेंड तात्पुरता आहे की नव्या राजकीय प्रवाहाची सुरुवात, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.