Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > देश

Brij Bhushan Sharan Singh

बृजभूषण शरण सिंह प्रकरणात मोठा निर्णय; राऊस अव्हेन्यू न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता, विनेश फोगाट अपील करणार

महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने पुरेशा पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले


बृजभूषण शरण सिंह प्रकरणात मोठा निर्णय राऊस अव्हेन्यू न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता विनेश फोगाट अपील करणार

Brij Bhushan Sharan Singh |

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात पुरावे अपुरे ठरल्याचा न्यायालयाचा निष्कर्ष; निकालानंतर बृजभूषण समर्थकांचा जल्लोष, विनेश फोगाट यांनी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला

महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने पुरेशा पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे. या निकालानंतर बृजभूषण शरण सिंह यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला, तर कुस्तीपटू आणि काँग्रेसच्या आमदार विनेश फोगाट यांनी निकालाविरोधात अपील करण्याची घोषणा केली आहे.

न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर विनेश फोगाट यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, सत्ताधारी पक्षातील प्रभावशाली नेत्याविरोधात रस्त्यावर उतरून एफआयआर दाखल करण्यासाठी मोठे धैर्य लागले. त्यांनी आरोप केला की, बृजभूषण शरण सिंह यांनी आपल्या राजकीय प्रभावाचा आणि बाहुबलाचा वापर करून अनेक महिला कुस्तीपटूंवर तक्रारी मागे घेण्यासाठी दबाव आणला. मात्र, अनेक महिला खेळाडूंनी ठाम भूमिका घेत कायदेशीर लढा सुरू ठेवला, असे त्यांनी नमूद केले.

पुढे बोलताना विनेश फोगाट म्हणाल्या की, महिला कुस्तीपटूंनी केलेल्या कथित लैंगिक छळाच्या आरोपांमध्ये न्यायालयाने बृजभूषण शरण सिंह यांना दोषी न ठरवल्याने त्यांना अत्यंत दुःख झाले आहे. सुरुवातीपासूनच संपूर्ण व्यवस्था, सरकार आणि संबंधित यंत्रणा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या निकालाविरोधात अपील दाखल करण्यासाठी वकिलांना सूचना देण्यात आल्या असून, ते लवकरच करण्यात येईल. न्यायासाठीचा लढा कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर बृजभूषण शरण सिंह यांनीही माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आरोप झाल्यानंतर पहिल्याच दिवशी आपण स्पष्ट केले होते की, जर एकाही आरोपात दोषी ठरलो तर स्वतःला फाशी देईन. मात्र आज न्यायालयाने सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली असून हा दिवस माझ्यासाठी आणि माझ्या समर्थकांसाठी आनंदाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणात २०१६ ते २०१९ या कालावधीत भारतीय कुस्ती महासंघाच्या कार्यालयात, अधिकृत निवासस्थानी तसेच परदेश दौऱ्यांदरम्यान महिला कुस्तीपटूंचा कथित लैंगिक छळ झाल्याचे आरोप करण्यात आले होते. या आरोपांनंतर २०२३ मध्ये विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह देशातील आघाडीच्या कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे मोठे आंदोलन केले होते.

आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. १५ जून २०२३ रोजी दिल्ली पोलिसांनी सहा वेळा खासदार राहिलेले बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे नोंदवले होते. या प्रकरणात WFI चे निलंबित सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनाही आरोपी करण्यात आले होते. मात्र, उपलब्ध पुरावे दोष सिद्ध करण्यासाठी अपुरे असल्याचे नमूद करत न्यायालयाने बृजभूषण शरण सिंह आणि सहआरोपी विनोद तोमर यांची निर्दोष मुक्तता केली.

Related to this topic: