गल्ल्यातील रोख रक्कमेवर मारला डल्ला व्यापारी, नागरीकांत भितीचे वातावरण...!
परभणी (Parbhani Shop Burglary) : जिंतूर तालुक्यातील बोरी येथील बसस्थानक परिसरात चोरट्यांनी तीन किराणा दुकान व कृषी केंद्र फोडून चाळीस हजाराची रोकड लंपास केली. ही घटना शुक्रवार १० जुलै रोजी मध्यरात्री नंतर घडली. बाजारपेठ परिसरात झालेल्या चोरीमुळे व्यापारी, नागरीकां मधून संताप व्यक्त होत आहे.
बस स्थानक परिसरात चोरट्यांकडून पोलिसांना आव्हान देणारी चोरी करण्यात आली आहे. यामध्ये गोपाळ माने यांचे स्वराज कृषी केंद्र फोडत पाच हजार, महादेव सोनटक्के यांच्या किराणा दुकानातून पाच हजार, माणिक भाग्यवंत यांच्या दुकानातून पंधरा हजार, हर्षनंदन घोलप यांच्या किराणातून पंधरा हजार रोकड चोरीला गेली आहे. शनिवार ११ जुलै रोजी सकाळी वृत्तपत्र वितरक आणि काही नागरीकांच्या निदर्शनास ही घटना आली. सपोनि. रामेश्वर धोंडगे यांच्या सुचनेनुसार सपोउपनि. महादेव गायकवाड, पोलीस अंमलदार शेख वसीम, शेख मोबीन, राजेश जटाळ, श्रीराम दंडवते, कोकाटे, कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
सपोनि. राम मुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान, ठसे पथक दाखल झाले. श्वानाला मात्र चोरट्यांचा मागोवा लागला नाही. स्थानिक गुन्हे शाखेचे पांडुरंग तुपसुंदर, मुकेश बुधवंत, उमेश चव्हाण, राम पौळ आदींनी सीसीटिव्ही व इतर बाबींची तपासणी केली. सपोनि.रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या घटनेनंतर चोरट्यांचा लवकर शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे. तपासाकडे लक्ष लागलेआहे. पोलिसांची रात्रीची गस्त, गायब झालेली वीज व पोलिसांनी घटनास्थळी झालेला विलंब या कारणांमुळे चोरी झालेल्या दुकानांचे मालक व काही सुजाण नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.
सीसीटिव्ही फुटेजचा आधार
घटनास्थळा जवळील काही व्यापारी बांधवांनी सीसीटिव्ही फुटेज उपलब्ध करुन दिले आहे. यााचा आधार घेऊन घटनेचा जलद गतीने तपास चालू केल्याचे सपोनि. रामेश्वर धोंडगे, महादेव गायकवाड यांनी सांगितले.