रेल्वेखाली आल्याचा बनाव फसला; भटक्या कुत्र्यांमुळे उघडकीस आला खुनाचा कट

परळी तालुक्यात पैशांच्या किरकोळ वादातून ३६ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

रेल्वेखाली आल्याचा बनाव फसला; भटक्या कुत्र्यांमुळे उघडकीस आला खुनाचा कट

Dog Exposes Crime

पैशांच्या किरकोळ वादातून जिवलग मित्रांची क्रूरता; परळीतील हत्याकांडाने जिल्हा हादरला

बीड (Dog Exposes Crime) : परळी तालुक्यात पैशांच्या किरकोळ वादातून ३६ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, खून केल्यानंतर आरोपींनी मृतदेह रेल्वे रुळांवर ठेवून आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोकाट कुत्र्यांनी मृतदेह रुळांवरून बाजूला ओढल्याने आरोपींचा डाव फसला आणि संपूर्ण हत्याकांडाचा पर्दाफाश झाला.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने तपास करत मृताच्या दोन जिवलग मित्रांना अटक केली आहे. अबजल उर्फ तौहिद खान कैराती खान असे मृत तरुणाचे नाव असून, ऋषिकेश फड आणि गौरव व्यास अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांमध्ये घनिष्ठ मैत्री असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

दारूच्या पार्टीतून सुरू झाला वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी तौहिद आणि त्याचे दोन्ही मित्र ऋषिकेशच्या कारमधून परळी तालुक्यातील वरवटी शिवारात गेले होते. दुपारपासूनच त्यांनी दारूचे सेवन केले होते. त्यानंतर रात्री पुन्हा एकदा तिघांनी एकत्र बसून मद्यपान केले.

दरम्यान, पैशांच्या देवाणघेवाणीवरून तिघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर संतापलेल्या ऋषिकेश आणि गौरव यांनी जवळच पडलेला मोठा दगड उचलून तौहिदच्या डोक्यावर वार केला. गंभीर जखमी होऊन तो खाली कोसळल्यानंतरही आरोपी थांबले नाहीत. त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तौहिदचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न

खून झाल्यानंतर आरोपी काही काळ घटनास्थळीच थांबून होते. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी मृतदेह कारमध्ये टाकला आणि लेंडेवाडी परिसरातील रेल्वे रुळांवर नेऊन ठेवला. तौहिदने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याचा आभास निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

मात्र, आरोपी निघून गेल्यानंतर परिसरातील मोकाट कुत्र्यांनी मृतदेह ओढत रेल्वे रुळांपासून दूर नेला. त्यामुळे रेल्वे अपघाताचा बनाव पूर्णपणे फसला आणि संशयाची सुई थेट खुनाकडे वळली.

रक्ताने माखलेला मृतदेह पाहून खळबळ

१ जून रोजी सकाळी स्थानिक नागरिकांना रेल्वे मार्गाजवळ रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

सीसीटीव्ही आणि कॉल रेकॉर्डमधून उलगडले रहस्य

तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स तसेच गुप्त माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीसह विविध तांत्रिक पुराव्यांचा आधार घेतला. या तपासातून ऋषिकेश फड आणि गौरव व्यास यांच्यावर संशय बळावला. चौकशीत दोघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांना अटक केली.

व्हायरल कॉल रेकॉर्डिंगचीही चर्चा

या घटनेशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येणारे एक कथित कॉल रेकॉर्डिंग सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या रेकॉर्डिंगमध्ये आरोपींपैकी एकाने घटनेबाबत माहिती दिल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

पुढील तपास सुरू

या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींकडून आणखी माहिती मिळवण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे. जिवलग मित्रांनीच पैशांच्या किरकोळ वादातून मित्राचा जीव घेतल्याची घटना समोर आल्याने परळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित सामग्री

बीडमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीला पेट्रोल ओतून पेटवल्याचा आरोप; उपचारादरम्यान अनुष्का शिरसाट यांचा मृत्यू

बीडमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीला पेट्रोल ओतून पेटवल्याचा आरोप; उपचारादरम्यान अनुष्का शिरसाट यांचा मृत्यू

बीडच्या पिंपळनेर परिसरात कौटुंबिक वादातून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिच्यावर पेट्रोल ओतून आग लावल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

Aug 13, 2026
4 दिवस कैद... बीडमध्ये ऊसतोड मजुरावर अमानुष अत्याचार; तोंडात लघुशंका केल्याचा गंभीर दावा

4 दिवस कैद... बीडमध्ये ऊसतोड मजुरावर अमानुष अत्याचार; तोंडात लघुशंका केल्याचा गंभीर दावा

बीड जिल्ह्यात ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Jul 09, 2026
नवविवाहित तलाठ्याच्या मृत्यूमागील कारण समोर? आईच्या तक्रारीनंतर पत्नी अडचणीत

नवविवाहित तलाठ्याच्या मृत्यूमागील कारण समोर? आईच्या तक्रारीनंतर पत्नी अडचणीत

अंबाजोगाई शहरालगतच्या मोरेवाडी परिसरात विवाहानंतर अवघ्या १२ दिवसांत एका तरुण तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती.

Jun 05, 2026
परळीत मध्यरात्री थरार; हॉटेल व्यावसायिकाची धारदार शस्त्राने हत्या

परळीत मध्यरात्री थरार; हॉटेल व्यावसायिकाची धारदार शस्त्राने हत्या

बीड जिल्ह्यातील परळी शहरात गुरुवारी (21 मे 2026) मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

May 22, 2026