परीक्षा कक्षात मोबाईल वापरताना साहिलला पर्यवेक्षकाने बाजूला घेतल्याचे फुटेजमध्ये दिसते; पालकांकडून प्राध्यापकावर भेदभावाचा आरोप
मुंबईतील पवई येथील IIT बॉम्बेमध्ये साहिल वाकोडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. साहिल परीक्षेला बसलेल्या कक्षातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, परीक्षेदरम्यान मोबाईल फोन वापरताना त्याला पर्यवेक्षकाने बाजूला घेतल्याचे या दृश्यांमधून दिसून येत आहे. त्यानंतर साहिल परीक्षा कक्षातून बाहेर पडला आणि पुढे वसतिगृहातील खोलीत परतल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
समोर आलेल्या सीसीटीव्ही दृश्यांनुसार, साहिल वाकोडे काळ्या रंगाचा टी-शर्ट घालून परीक्षा कक्षातील पहिल्या रांगेत बसलेला दिसतो. काही वेळाने एक पर्यवेक्षक त्याच्याजवळ येऊन थांबतात. त्यानंतर साहिल आपल्या जागेवरून उठतो. पुन्हा जागेवर बसल्यानंतर तो मोबाईल फोन पर्यवेक्षकाकडे देताना दिसतो.
मोबाईल फोन ताब्यात दिल्यानंतर साहिल आणि पर्यवेक्षक यांच्यात काही वेळ चर्चा झाल्याचे फुटेजमध्ये दिसते. त्यानंतर साहिल आपल्या वस्तू जमा करतो आणि परीक्षा कक्षातून बाहेर जातो. या संपूर्ण घटनाक्रमाचे दृश्य आता समोर आल्याने प्रकरणाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
Mumbai - New CCTV footage has surfaced in connection with the death of 22-year-old IIT Bombay student Sahil Wakode, showing him being taken out of an examination room after he was allegedly questioned over the use of a mobile phone during an exam, Wakode was reportedly found… pic.twitter.com/vd4dbszhtJ
— NextMinute News (@nextminutenews7) September 23, 2026
परीक्षेदरम्यान ChatGPT वापरल्याचा दावा
साहिलच्या मृत्यूनंतर IIT बॉम्बेकडून याबाबत प्रतिक्रिया देण्यात आली होती. संस्थेच्या माहितीनुसार, परीक्षेदरम्यान साहिल मोबाईल फोन वापरताना आढळला होता. प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी त्याने प्रश्नपत्रिका ChatGPT वर अपलोड केल्याचेही संस्थेकडून सांगण्यात आले होते.
मात्र, या घटनेनंतर साहिलवर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नसल्याचे IIT बॉम्बेकडून स्पष्ट करण्यात आले होते.
पालकांचा भेदभावाचा आरोप
दरम्यान, साहिलच्या पालकांनी संस्थेतील छळ आणि भेदभावाचा आरोप केला आहे. साहिलसोबत संस्थेत भेदभाव केला जात असल्याचा दावा त्याचे वडील रवींद्र वाकोडे आणि आई सोनाली यांनी केला आहे.
या प्रकरणात साहिलच्या पालकांनी प्राध्यापक सूर्यनारायण दूला यांच्या अटकेची मागणीही केली आहे. दूला यांनी साहिलशी भेदभाव केल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे.
साहिलच्या परीक्षेतील सीसीटीव्ही फुटेजमुळे परीक्षेदरम्यान नेमके काय घडले, याबाबतचे काही दृश्य आता समोर आले असले तरी त्यानंतरच्या घटनाक्रमासंदर्भातील पालकांचे आरोप आणि संस्थेची भूमिका या दोन्ही बाजू या प्रकरणात महत्त्वाच्या ठरत आहेत.