5,053 पानी आरोपपत्रात सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगे यांच्याविरोधातील तपासाचे पुरावे; ChatGPT, Google Searchसह विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवरील डेटाची छाननी
पुणे : केतन अग्रवाल खून प्रकरणाच्या तपासात लोहगड किल्ल्याशी संबंधित महत्त्वाची डिजिटल माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या 5 हजार 053 पानी आरोपपत्रानुसार, सिया गोयलने केतन अग्रवालला ज्या ठिकाणाहून 18 जून 2026 रोजी दरीत ढकलल्याचा आरोप आहे, त्या जागेची यापूर्वीच पाहणी केली होती. याच ठिकाणी 31 मे रोजी केतनला कडेवर उभे करून सियाने त्याचे विविध फोटो काढल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 31 मे 2026 रोजी सिया आणि केतन लोहगडवर गेले होते. त्यावेळी सियाने केतनला दरीच्या कड्याजवळ उभे केले आणि मागील बाजूने वेगवेगळ्या अँगलमधून त्याचे छायाचित्रण केले. या फोटोंमध्ये केतन समोरील धरणाचे पाणी आणि परिसरातील निसर्गसौंदर्य पाहत असल्याचे दिसत असल्याचे तपास यंत्रणेने नमूद केले आहे. पुढील कथित नियोजनासाठी या छायाचित्रांचा वापर करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.
दरम्यान, सिया आणि केतन 14 जून 2026 रोजीही लोहगडवर गेले होते. त्या वेळी सियाने केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केल्याचे, मात्र तो प्रयत्न यशस्वी झाला नसल्याचे तपासातून समोर आल्याचे पोलिसांच्या कागदपत्रांत नमूद आहे.
या प्रकरणातील डिजिटल तपासात आरोपींमधील तब्बल 1 हजार 801 चॅटिंगचा डेटा पोलिसांना मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. यातील 11 व्हॉट्सॲप चॅट डिलीट करण्यात आले होते. फॉरेन्सिक तपासाच्या माध्यमातून हे हटवलेले संभाषण पुन्हा मिळवण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.
केवळ चॅटिंगपुरताच तपास मर्यादित न ठेवता पोलिसांनी मोबाईल फोन, सीडीआर, छायाचित्रे आणि तांत्रिक विश्लेषण अहवालाचीही तपासणी केली आहे. या सर्व डिजिटल पुराव्यांचा समावेश आरोपपत्रात करण्यात आला असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांच्या कागदपत्रांनुसार, मोबाईल डेटाच्या विश्लेषणादरम्यान विविध ॲप्स आणि प्लॅटफॉर्मवरील संभाषण तसेच सर्च डेटाची तपासणी करण्यात आली. यामध्ये बायोमी ॲपवरील 135, ChatGPT वरील 81, Facebook वरील 19, Instagram वरील 248, नॉलेजसीवरील 151, Native Messages मधील 262, Resend मधील 410, Snapchat वरील 128 आणि WhatsApp वरील 367 संभाषणांचा किंवा सर्च डेटाचा तपास झाल्याचे पोलिसांच्या कागदपत्रांत नमूद असल्याचे समोर आले आहे.
लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालचा दरीत पडून मृत्यू झाल्याचे सुरुवातीला दिसत असलेले हे प्रकरण आता आरोपपत्रातील डिजिटल पुराव्यांमुळे कथित पूर्वनियोजित कटाच्या दिशेने तपासले गेले आहे. सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हांगे यांच्याविरोधात तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांचा तपशील 5 हजार 053 पानी आरोपपत्रात मांडण्यात आला आहे.