पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी रिसोड नगर परिषदेचा पुढाकार; प्रांगणात कृत्रिम विसर्जन तलावाची सोय
रिसोड (Risod Municipal Council Ganeshotsav) : श्री गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर नगर परिषद रिसोड प्रशासनाच्या वतीने शहरातील नागरिकांना घरगुती श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. 'माझी वसुंधरा अभियान' आणि 'स्वच्छ सर्वेक्षण २०२६' अंतर्गत जलप्रदूषण रोखण्यासाठी नगर परिषदेने हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.
घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी (Risod Municipal Council) नगर परिषद प्रांगण, रिसोड येथे सुसज्ज कृत्रिम विसर्जन तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनाच्या वेळी मूर्तीसोबत येणारे हार, फुले, पत्री इत्यादी पूजा साहित्य थेट पाण्यात न टाकता त्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, यासाठी विसर्जन ठिकाणी स्वतंत्र 'निर्माल्य कलश' ठेवण्यात आले आहेत. संकलित निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे. विसर्जनस्थळी भाविकांच्या सोयीसाठी प्रकाश व्यवस्था, स्वच्छता आणि आवश्यक कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहेत.
गणरायाला (Ganeshotsav) भावपूर्ण निरोप देताना निसर्गाचे रक्षण करणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) आणि रासायनिक रंगांमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन नगर परिषदेने तयार केलेल्या कृत्रिम तलावातच करावे, तसेच निर्माल्याचे पावित्र्य राखण्यासाठी ते निर्माल्य कलशातच टाकावे, असे आवाहन नगराध्यक्ष भगवानराव शिरसागर, उपाध्यक्ष विष्णू कदम, मुख्याधिकारी सतीश शेवदा,आरोग्य सभापती संतोष चराटे आरोग्य विभाग प्रमुख रोहित बडेल यांच्या सह नगर परिषद रिसोड प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.