मानोरा (Chikhali Ganeshotsav) : तालुक्यातील चिखली येथील तरुणांनी यंदाच्या गणेशोत्सवात एक अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय पाऊल उचलले आहे. सुरुवातीला या छोट्याशा गावात चार वेगवेगळ्या ठिकाणी गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली होती. मात्र, 'अनेकांतून एकतेचे' स्वरूप निर्माण करण्याचा निर्णय घेत गावातील सर्वच मंडळांचे तरुण एकत्र आले आणि त्यांनी एकोप्याचा नवा आदर्श घालून दिला.
आज बुधवारी सर्व मंडळांनी एकत्र येत संपूर्ण गावाची एकच 'महापंगत' (महाप्रसाद) आयोजित केली. यानंतर गावातून बाप्पाची अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक घरासमोर थांबून बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा करण्यात आली. या मंगलमय सोहळ्यात गावातील तीन सार्वजनिक मंडळांचे तसेच घरगुती गणपती बाप्पा सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात पार पडलेल्या या (Chikhali Ganeshotsav) मिरवणुकीत गावातील तरुण, तरुणी, ज्येष्ठ पुरुष आणि महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. चिखली गावातील तरुणांनी साधलेली ही एकता खरोखरच विशेष असून, संपूर्ण तालुक्यात या स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुक होत आहे.
'हम सब एक है' चा संदेश
गावातील विघ्नहर्ता गणेश मंडळ, न्यू विघ्नहर्ता गणेश मंडळ आणि बाल गणेश मंडळ यांनी एकत्र येत हा सोहळा पार पाडला. विशेष म्हणजे या (Chikhali Ganeshotsav) विसर्जन मिरवणुकीत डफडे व इतर वाद्यांच्या तालावर तरुण, तरुणी, महिला व पुरुषांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. अतिशय आनंदमय वातावरणात बाप्पाला निरोप देत चिखलीच्या गावकऱ्यांनी 'हम सब एक है' चा सुंदर संदेश समाजाला दिला आहे.