दुष्काळग्रस्त शेतकर्यांना प्रति शेतकरी ५० हजार रुपये तातडीने मदत करण्याची मागणी
हिंगोली (Chandrashekhar Bawankule) : जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला असला तरी शेतकर्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये तातडीने मदत करावी या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या वाहनाचा ताफा अडविला.
२८ सप्टेंबर सोमवार रोजी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीतून बाहेर पडल्यानंतर प्रवेशव्दारावर पोलिसांच्या सायरनचा आवाज त्यांच्या कानावर पडला. याचवेळी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाहनांचा ताफा कळमनुरी तालुक्यातील आराटी येथील नुकसान ग्रस्त शेती पिकांची पाहणी करून शासकीय विश्रामगृहाकडे जात होता.
त्याचवेळी अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशव्दारा समोरील रस्त्यावर येऊन महसुलमंत्री बावनकुळे यांच्या वाहनाचा ताफा अडविला. यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष डॉ. सतिष पाचपुते, सुरेशअप्पा सराफ, डॉ. रमेश शिंदे, मिलिंद उबाळे, बंटी नागरे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.