महंमदवाडीतील रेहेजा विस्टा परिसरातील घटना; एक तरुण गंभीर जखमी, डंपर चालकाला अटक
पुणे : महंमदवाडी परिसरात भरधाव डंपरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत २० वर्षीय IT इंजिनिअरचा मृत्यू झाला. या अपघातात त्याच्यासोबत असलेला तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता रेहेजा विस्टा परिसरात घडली.
मृत तरुणाचे नाव हमजा इब्राहिम सरकार (वय २० वर्षे) असे आहे. तर केस वसीम खान (वय २० वर्षे) हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हमजा आणि वसीम हे दोघे दुचाकीवरून रेहेजा विस्टा परिसरातून जात होते. त्याचवेळी त्यांच्या दुचाकीला डंपरने जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी डंपरच्या मागील चाकाखाली गेली. या दुर्घटनेत डंपरचे चाक हमजाच्या अंगावरून गेल्याने त्याचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या डंपरसह चालक भागण्णा लक्ष्मण कटबू (वय ३४) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
या भीषण दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्तारोको आंदोलन केले.
दरम्यान, पुणे-सातारा महामार्गावरही आज अपघाताची घटना घडली. धांगवडी हद्दीत महामार्गावरून सर्विस रस्त्यावर जाण्यासाठी एका कारने अचानक वळण घेतले. यावेळी पाठीमागून येणारी दुचाकी कारला धडकली. या अपघातात दुचाकीवरील तरुण आणि तरुणी जखमी झाले.
कारचालकाने बेफिकिरीने अचानक वळण घेतल्याने दुचाकीस्वाराला कारची थेट धडक बसल्याचे समोर आले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताचा संपूर्ण प्रकार परिसरातील एका CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.