पाच अज्ञातांविरुद्ध गुन्हा; रात्रीच सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांनी ओळखल्या जाणाऱ्या वर्धा जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी घटना समोर आली आहे. वर्धा रेल्वे स्थानक परिसरातून एका 19 वर्षीय तरुणीला ऑटोमध्ये बसवून शहरातील विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी वर्धा रेल्वे पोलिसांनी पाच अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 70(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, उमरेड तालुक्यातील तरुणी 23 सप्टेंबर रोजी चंद्रपूरला जाण्यासाठी घरातून निघाली होती. चंद्रपूरहून रेल्वेने ती सेवाग्राम येथे आली. तेथून ऑटोने वर्धा रेल्वे स्थानक गाठले.
स्थानक परिसरात रात्री काही अज्ञात व्यक्ती तिच्या संपर्कात आल्या. मदतीच्या बहाण्याने तिला ऑटोमध्ये बसवून शहरातील विविध ठिकाणी नेण्यात आले. यावेळी आपल्यावर जबरी लैंगिक अत्याचार झाल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. घटनेबाबत कोणाला सांगू नये, अशी धमकी दिल्याचेही तिने सांगितले.
पहाटे तिला वर्धा बसस्थानक परिसरात सोडण्यात आले. त्यानंतर तिने रेल्वे स्थानक गाठून पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी रात्रीच रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तरुणी स्थानकात कोणाच्या संपर्कात आली, ती कोणत्या ऑटोमध्ये बसली आणि ऑटो कोणत्या दिशेने गेला, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाचे सूत्र पुढे सरकले असून संशयितांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
FIRनुसार, 24 सप्टेंबर रोजी पहाटे 5 ते 5.30 वाजण्याच्या दरम्यान घटना घडली. 25 सप्टेंबर रोजी रात्री 12.48 वाजता FIR क्रमांक 0275/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचही आरोपी अज्ञात असून त्यांचा शोध सुरू आहे. ऑटोचा मागोवा, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे. या प्रकरणातील आरोप तपासाधीन असून आरोपींचा दोष न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहे.