तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी
मानोरा (Manora Taluka Dry Drought) : वाशिम जिल्ह्यासह मानोरा तालुक्यात निर्माण झालेल्या गंभीर पावसाच्या खंडामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरीपुत्र ऋषी पाटील चौधरी यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची मुंबई येथील सिद्धगड बंगल्यावर भेट घेऊन शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडत निवेदन दिले.
वाशिम जिल्हा हा आकांक्षीत जिल्हा असून, जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रोजगार व उत्पन्नाचे मर्यादित साधन आहे. त्यातच मानोरा तालुक्यातील जमीन मोठ्या प्रमाणात खडकाळ व डोंगराळ असल्याने पावसाचा खंड पडताच पिकांवर त्याचा गंभीर परिणाम होतो. सध्या सोयाबीन, कापूस यांसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे चौधरी यांनी कृषिमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडताना सांगितले की, “आपण आमचे मायबाप आहात. मानोरा तालुक्यावर अनेक वेळा अन्याय झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. यावेळी मात्र आमच्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देऊ नका. तातडीने पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी,” अशी मागणी केली. मानोरा तालुक्यातील परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शासनस्तरावर तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळेल यासाठी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी त्यांनी चौधरी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपली ठोस भूमिका कृषिमंत्र्यांसमोर मांडली.
कृषी मंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दि. १९ व २० सप्टेंबर रोजी नियोजीत दौरा असुन ते प्रशासनाच्या ताफ्यासह मानोरा तालुक्यातील कुपटा मंडळात पिक नुकसानीची पाहणी करणार असल्याचे त्यांच्या नियोजीत दौऱ्यात समावेश केला आहे.