Ketan Agrawal Murder Case

केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; केतनचे टक्कल ठरले नात्यातील दुराव्याचे कारण?सियाला लग्न नको होते...

पुण्यातील तरुण उद्योजक केतन अग्रवाल हत्याप्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणातील अनेक धक्कादायक पैलू उघड होत आहेत.

केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; केतनचे टक्कल ठरले नात्यातील दुराव्याचे कारण?सियाला लग्न नको होते...

Ketan Agrawal Murder Case

मोबाईल चॅट्स, कॉल रेकॉर्ड, क्राईम सीन रिक्रिएशन आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांचा तपास वेगात; दोन्ही आरोपींकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप

(Ketan Agrawal Murder Case) पुण्यातील तरुण उद्योजक केतन अग्रवाल हत्याप्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणातील अनेक धक्कादायक पैलू उघड होत आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी पूर्वनियोजित कट रचून लोहगड किल्ल्यावर केतनची हत्या केल्याचा संशय अधिक बळकट होत आहे. घटनास्थळावरील पुरावे, मोबाईल डेटा, कॉल रेकॉर्ड आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा स्पष्ट केली आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सिया गोयलला केतनसोबत विवाह करायचा नव्हता. केतन टक्कल असल्याने विग वापरत असल्याची बाब तिला मान्य नव्हती आणि याच कारणावरून दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर सिया आणि चेतन यांनी मिळून केतनचा कायमचा काटा काढण्याचा कट आखल्याचा आरोप आहे.

केतनला ट्रेकिंगची विशेष आवड असल्याची माहिती आरोपींना होती. त्याचाच फायदा घेत त्याला किल्ल्यावर नेऊन खोल दरीत ढकलून मृत्यू अपघाती असल्याचा आभास निर्माण करण्याची योजना आखण्यात आली. यासाठी लोहगड किल्ल्याची निवड करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासानुसार, आरोपींनी तीन वेळा किल्ल्यावर जाऊन विविध ठिकाणांची रेकी केली. कोणत्या ठिकाणावरून ढकलल्यास तो अपघात वाटेल, याची पाहणी केल्याचा दावा तपासातून समोर आला आहे.

१४ जून रोजी केतन आणि सिया प्रथमच लोहगडावर गेले होते. त्यावेळी केतनला दरीत ढकलण्याचा कथित प्रयत्न झाला. मात्र, खाली कोसळताना त्याने झाडाची फांदी पकडल्याने त्याचा जीव वाचला. या प्रसंगानंतर "साप दिसला होता" असे सांगून सियाने परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर केतनला एकटीने ढकलणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने तिने चेतनची मदत घेतल्याचा पोलिसांचा दावा आहे.

यानंतर १८ जून रोजी चेतन चौधरीही लोहगडावर पोहोचला. तपासानुसार, तो काही अंतर राखून मागे चालत होता. योग्य संधी मिळताच आणि सियाकडून संकेत मिळाल्यानंतर चेतनने केतनला खोल दरीत ढकलल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

घटनेनंतर सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे मानले जात होते. मात्र, मोबाईल कॉल डिटेल्स, आरोपींच्या हालचाली, घटनास्थळावरील पुरावे आणि इतर तांत्रिक विश्लेषणातून हा पूर्वनियोजित कट असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

चौकशीदरम्यान सिया गोयलने पोलिसांसमोर नवी भूमिका मांडली. तिने केतनशी लग्न करण्याची इच्छा नसल्याचे सांगितले होते आणि त्याने लग्न मोडण्यास नकार दिल्याचा दावा तिने केला. मात्र, पोलिसांनी दोघांच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप आणि इतर चॅट्सची तपासणी केली असता तिचा दावा खोटा असल्याचे उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले. उपलब्ध संवादांमध्ये लग्नाला विरोध किंवा वादाचा कोणताही उल्लेख नसून, दोघांमध्ये प्रेमळ संभाषण आणि लग्नाच्या तयारीसंदर्भातील चर्चा झाल्याचे तपासात समोर आले आहे.

यामुळे सियाचा नवा दावा पोलिसांनी फेटाळला असून, ती केवळ स्वतःचा बचाव करण्यासाठी दिशाभूल करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तपास यंत्रणा फॉरेन्सिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक डेटाच्या आधारे प्रत्येक बाजूची पडताळणी करत आहे.

अटक झाल्यानंतर सिया गोयलला भेटण्यासाठी तिच्या कुटुंबातील एकही सदस्य पोलीस कोठडीत आलेला नसल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिली. सिया आई-वडील आणि भावासोबत राहत होती. तिचे वडील सध्या रुग्णालयात उपचार घेत असून आई त्यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे, सहआरोपी चेतन चौधरीला भेटण्यासाठी त्याचे वडील पोलीस ठाण्यात आले होते आणि त्यांनी तपासाची माहिती घेतली.

या प्रकरणातील तपास अधिक मजबूत करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगडावर 'क्राईम सीन रिक्रिएशन' केले. मध्यरात्री पार पडलेल्या या प्रक्रियेदरम्यान पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल स्वतः घटनास्थळी उपस्थित होते. तिकीट घरापासून ते ज्या दरीत केतनला ढकलल्याचा आरोप आहे, त्या संपूर्ण मार्गाची पोलिसांनी पाहणी केली.

या संदर्भात पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सांगितले की, कोणत्याही गंभीर गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी आणि परिस्थितीजन्य पुरावे अत्यंत महत्त्वाचे असतात. मृतदेह ज्या ठिकाणी सापडला, आरोपींची हालचाल आणि भौगोलिक परिस्थिती यांचा सखोल अभ्यास करण्यात आला असून न्यायालयीन प्रक्रियेत हा तपास महत्त्वाचा ठरेल.

दरम्यान, पोलीस कोठडीत असलेले सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी आता एकमेकांवरच हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. चेतनच्या म्हणण्यानुसार, त्याला सियासोबत पळून जायचे होते; मात्र केतनची हत्या करण्याचा आग्रह सियानेच धरला होता. दुसरीकडे, सियाने संपूर्ण कल्पना चेतनची असल्याचा प्रतिदावा केला आहे. पोलिसांच्या मते, शिक्षा कमी व्हावी यासाठी दोघेही जबाब एकमेकांवर ढकलत आहेत.

या हत्याप्रकरणाला आता कायदेशीरदृष्ट्याही महत्त्वाचे वळण मिळाले आहे. मुख्य आरोपी सिया गोयलच्या बचावासाठी सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना तपास सुरू असून त्यांची पक्षकार तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करत असल्याचे सांगितले. तसेच भारतीय संविधानाने प्रत्येक आरोपीला न्यायालयात स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार दिला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या लोणावळा ग्रामीण पोलीस दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत असून न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी २९ जूनपर्यंत वाढवली आहे.

संबंधित सामग्री

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
केतन अग्रवाल प्रकरणात मोठा डिजिटल पुरावा; 1,801 चॅट्सचा डेटा रिकव्हर, लोहगडवरील फोटोंमधून कटाचा तपास पुढे

केतन अग्रवाल प्रकरणात मोठा डिजिटल पुरावा; 1,801 चॅट्सचा डेटा रिकव्हर, लोहगडवरील फोटोंमधून कटाचा तपास पुढे

केतन अग्रवाल प्रकरणात 1,801 चॅट्सचा डेटा, 11 डिलीट WhatsApp चॅट्स आणि लोहगडवरील फोटोंचा तपास; 5,053 पानी आरोपपत्रात डिजिटल पुरावे.

Oct 03, 2026
निलेश घायवळसह सर्व आरोपींची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

निलेश घायवळसह सर्व आरोपींची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता; पुराव्याअभावी मोक्का न्यायालयाचा निर्णय

२०२०च्या खंडणी प्रकरणात निलेश घायवळसह सर्व आरोपींची मोक्का कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. फिर्यादी आणि साक्षीदारांनी आरोप नाकारले.

Sep 29, 2026
लोहगड हत्या प्रकरणात ५,०५३ पानांची चार्जशीट; डिलीटेड चॅट्स, Google History अन् ‘माही’ अकाउंटमधून तपासाला नवे पुरावे

लोहगड हत्या प्रकरणात ५,०५३ पानांची चार्जशीट; डिलीटेड चॅट्स, Google History अन् ‘माही’ अकाउंटमधून तपासाला नवे पुरावे

लोहगड हत्या प्रकरणात ५,०५३ पानांची चार्जशीट दाखल. सिया, चेतन आणि रितेश आरोपी; डिलीटेड चॅट्स, Google History अन् फेक Instagram अकाउंटचे पुरावे समोर.

Sep 29, 2026
नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी पहाटे घुसखोरी; बॅगेत हातोडा, पकड आणि 10 मीटर दोरी

नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील निवासस्थानी पहाटे घुसखोरी; बॅगेत हातोडा, पकड आणि 10 मीटर दोरी

नीलम गोऱ्हेंच्या पुण्यातील घरात पहाटे तरुणाची घुसखोरी. बॅगेत हातोडा, पकड, हातमोजे आणि 10 मीटर दोरी सापडल्याने तपासाला वेग.

Sep 28, 2026