आखाडा बाळापूर (Illegal sand mining) : कळमनुरी तालुक्यातील बिबथर शिवारात कयाधू नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिसांनी थेट नदीपात्रात जाऊन छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी 1 ट्रक्टर आणि 2 ट्राली जप्त केल्या असून एक ट्रक्टर चालक ट्राली सोडून पसार झाला.
पावसाळा सुरू झाल्याने वाळू घाटांचे लिलाव बंद करण्यात आले आहेत. तरीही कयाधू नदीच्या पात्रातून आणि इतर भागातून रात्रंदिवस अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी होत्या.
आज पोलिस अधीक्षक श्रेनिक लोढा आणि पोलिस निरीक्षक शरद मरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली.
पथकात प्रशांत शिंदे, सुनील रिठे, सागर वाढोणकर, चालक प्रवीण चव्हाण, होमगार्ड बांगर आणि खिल्लारे यांचा समावेश होता.
छाप्यात अंदाजे 7 लाख 42 हजार 500 रुपये किमतीचा ट्रक्टर आणि दोन ट्राली असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती बिट प्रमुख सुनील रिठे यांनी रात्री 7 वाजता दिली. (Illegal sand mining) पोलिसांनी पळालेल्या ट्रक्टर चालकाचा शोध सुरू केला आहे. रात्री उशिरापर्यंत आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.