हिंगोलीतील श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीला येणाऱ्या भाविकांच्या अलोट गर्दीमुळे वाहतूक बदलाचा घेतला निर्णय
हिंगोली (Shri Vighnaharta Chintamani Ganpati) : शहरातील गड्डेपिर गल्ली येथील श्री चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी आणि प्रसिद्ध नवसाचा मोदक घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. दिनांक 24 आणि 25 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातून, इतर जिल्ह्यातून व इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक हिंगोलीत येणार आहेत. मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने वाहतुकीत बदल केले आहेत.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी 24 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेपासून ते दि. 25 सप्टेंबर रोजी रात्री 24.00 वाजेपर्यंत खालीलप्रमाणे अधिसूचना काढली आहे.
सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग :
1. इंदिरा गांधी चौक ते अंबिका टॉकीज पर्यंत सर्व रोडवरील वाहने पूर्णपणे बंद.
2. गवळीपुरा जलेश्वर मंदीर ते महात्मा गांधी चौक कडे जाणारा सर्व रोडवरील वाहने पूर्णपणे बंद.
3. खुराना पेट्रोल पंप चौक ते महात्मा गांधी चौक कडे जाणारा सर्व रोडवरील वाहने पूर्णपणे बंद.
4. जुने नगर पालीका चौक ते अंबिका टॉकीज कडे जाणारा सर्व रोडवरील वाहने पूर्णपणे बंद.
5. जुनी गोदावरी हॉटेल कॉर्नर ते महात्मा गांधी चौक सर्व वाहने पूर्णपणे बंद.
पर्यायी मार्ग :
1. जवळा पळशी रस्त्याने येणारे वाहन खुशाल नगर, नवा मोंढा, रेल्वे स्टेशन रोडने येतील व जातील.
2. कळमनुरी तसेच औंढा (ना) कडून येणारे वाहन नांदेड नाका जिल्हा परिषद रोडने येतील व जातील.
3. वाशिम कडून येणारे वाहन छ. शिवाजी महाराज चौक, जिल्हा परिषद रोड नांदेड नाका मार्गे येतील व जातील.
तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी केले आहे.