यवतमाळ जिल्ह्यातील दहेली गावाजवळ कुपटी नदीवरील पुलावर मध्यरात्री घडलेल्या भीषण पुरदुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.
दहेलीजवळील कुपटी नदीवरील पुलावरून कार पुराच्या प्रवाहात वाहून गेली; झाडाच्या फांदीचा आधार घेत अविनाश खंडारे तब्बल चार तास मृत्यूशी झुंज देत राहिले
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील दहेली गावाजवळ कुपटी नदीवरील पुलावर मध्यरात्री घडलेल्या भीषण पुरदुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतून सुदैवाने बचावलेल्या अविनाश खंडारे यांनी पत्नी आणि दोन्ही मुली आपल्या डोळ्यांसमोर पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची वेदनादायी घटना सांगताना भावनांना वाट मोकळी करून दिली.
'पप्पा मला वाचवा...' असा आर्त आवाज मुली देत होत्या. पत्नी आणि मुलींना बाहेर काढण्यासाठी त्यांचे हात पकडले होते; मात्र अचानक आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे हात सुटला आणि माझ्या आयुष्याचे सर्वस्व माझ्या डोळ्यांसमोर वाहून गेले, अशी व्यथा अविनाश खंडारे यांनी व्यक्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश खंडारे हे पत्नी आणि दोन मुलींसह नातेवाईकांच्या गावावरून कारने परतत होते. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दहेली गावाजवळील कुपटी नदीवरील पूल ओलांडताना मुसळधार पाऊस, दाट अंधार आणि पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांची कार पाण्याच्या विळख्यात अडकली. काही क्षणांतच वेगवान प्रवाहाने कारला वाहून नेले.
या प्रसंगी अविनाश यांनी पत्नी आणि दोन्ही मुलींना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की त्यांची पकड सुटली. कार सुमारे ५० फूट अंतरावर जाऊन प्रवाहात अडकली. या दुर्घटनेत पत्नी माधवी खंडारे, मोठी मुलगी प्राची खंडारे आणि चिमुकली सांची खंडारे यांचा पाण्यात बुडून आणि गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.
कार पाण्यात वाहत असतानाच अविनाश खंडारे यांनी मोठ्या भावासह इतर नातेवाईकांना दूरध्वनीवरून मदतीसाठी संपर्क साधला. त्यानंतर चालकाच्या बाजूची काच उघडून ते कसाबसा बाहेर पडण्यात यशस्वी झाले. जवळील झाडाच्या फांदीचा आधार घेत त्यांनी स्वतःचा जीव वाचवला. मदतीची प्रतीक्षा करत ते जवळपास चार तास झाडाला धरून आरडाओरडा करत राहिले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बोटीच्या साहाय्याने अविनाश खंडारे यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र पत्नी आणि दोन्ही मुलींना वाचवता न आल्याची सल आयुष्यभर राहील, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनीव्यक्त केली. या हृदयद्रावक दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.