Breaking News
  • पुण्याहून मुंबईला येणारी वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल
  • रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट, नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ
  • आळंदीमध्ये इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहतेय, चारही पूल गेले पाण्याखाली
  • मुंबई, पुणे परिसरात पुढील 2 दिवस रेड अलर्ट
  • मुंबईतील सकाळची विमानसेवा रद्द झाल्यामुळे प्रवासात अडचणी
  • कोकण रेल्वे मार्गावर ट्रेन विलंबाने; मुसळधार पावसाचा फटका
  • मावळमध्ये एनडीआरएफची धाडसी कारवाई; पाण्यात अडकलेल्या बसमधील ३७ प्रवाशांची सुखरूप सुटका
  • साताऱ्यात सुसाट्याच्या वाऱ्याने शाळेचे छप्पर उडाले
  • पुणे मुंबई दरम्यानची एसटी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद

होम > आपले शहर > मुंबई

SRPF Constable

महाराष्ट्र लोक भवनात SRPF जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; महिला कॉन्स्टेबलशी प्रेमसंबंधांचाही तपास

'महाराष्ट्र लोक भवन' येथे कर्तव्य बजावत असताना कॉन्स्टेबल कौस्तुभ सांगळे यांनी रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केली.


महाराष्ट्र लोक भवनात srpf जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या महिला कॉन्स्टेबलशी प्रेमसंबंधांचाही तपास

SRPF Constable |

मुंबईतील अतिसुरक्षित मलबार हिल परिसरातील 'महाराष्ट्र लोक भवन' येथे कर्तव्य बजावत असताना राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) गट-16 मधील कॉन्स्टेबल कौस्तुभ सांगळे यांनी स्वतःच्या सर्व्हिस एसएलआर (SLR) रायफलमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या घटनेचा तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांसह एसआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी विविध अंगांनी चौकशी करत असून, प्राथमिक तपासातून काही महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत.

माहितीनुसार, कौस्तुभ सांगळे हे 2024 च्या बॅचमधील SRPF कॉन्स्टेबल होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली होती. ते 10 जून रोजी मुंबईत रुजू झाले आणि त्यानंतर त्यांना राज्य सरकारच्या अतिसंवेदनशील 'महाराष्ट्र लोक भवन' येथे सुरक्षा कर्तव्यासाठी तैनात करण्यात आले. काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज असून, घटनास्थळावरून एक सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. तिची तपासणी सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत त्यांची ड्युटी लोक भवनातील टॉवर-2 येथे होती. एसआरपीएफमध्ये प्रत्येक तीन तासांनी सुरक्षा पाळी बदलली जाते. कर्तव्यावर असताना ते एका बंदिस्त भागात गेले आणि स्वतःच्या 7.62 मिमी एसएलआर रायफलने स्वतःवर गोळी झाडली. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रात्री पुढील पाळीतील कर्मचारी त्यांना बदलण्यासाठी आले असता रक्ताचे डाग दिसून आले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. मलबार हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शस्त्र जप्त केले असून फॉरेन्सिक तपास सुरू केला आहे.

या तपासात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचाही तपशील समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कौस्तुभ यांचे मीरा-भाईंदर पोलीस दलातील एका महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये विवाहाबाबत चर्चा झाल्याचेही सांगितले जाते. मात्र, संबंधित महिला कॉन्स्टेबलने नंतर लग्नास नकार दिला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलसोबत निश्चित केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या घडामोडींमुळे कौस्तुभ मानसिक तणावाखाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

तपास यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार, महिला कॉन्स्टेबलचे लग्न ठरल्यानंतर कौस्तुभ यांनी त्या महिलेसोबतचे काही खासगी फोटो तिच्या होणाऱ्या पतीला पाठवले होते. या कृतीमागील उद्देश काय होता आणि त्यामुळे संबंधित व्यक्तींमध्ये काही वाद निर्माण झाला होता का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

याशिवाय, कौस्तुभ यांनी संबंधित महिला कॉन्स्टेबलला अनेकदा फोन करून आत्महत्येच्या धमक्या दिल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. कौस्तुभ अशा प्रकारचे पाऊल उचलू शकतात, याची माहिती त्या महिला कॉन्स्टेबलने यापूर्वीच भाईंदर पोलिसांना दिल्याचेही समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी कोणती पावले उचलली, वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली होती का, तसेच त्यांना समुपदेशन किंवा इतर मदत उपलब्ध करून देण्यात आली होती का, याची चौकशी आता सुरू आहे.

तपासादरम्यान कौस्तुभ यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचीही माहिती समोर आली आहे. लहानपणीच त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. त्यांच्या दोन बहिणींपैकी एका बहिणीने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती, तर दुसरी विवाहित आहे. या कौटुंबिक परिस्थितीचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर काही परिणाम झाला होता का, याचाही तपास सुरू आहे.

तपासाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे एसआरपीएफची अंतर्गत मानसिक आरोग्य तपासणी प्रक्रिया. नियमानुसार कर्मचाऱ्यांची ठराविक कालावधीनंतर मानसिक आरोग्य तपासणी झाली होती का, याची पडताळणी अधिकारी करत आहेत. मलबार हिल पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद (ADR) केली असून, विविध पैलूंनी तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

Related to this topic: