नागपूर शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाची शक्यता निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
नागपूर (Shekhu Gang) : नागपूर शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाची शक्यता निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. शहराचे नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारलेल्या दिवशीच गुन्हेगारी विश्वाशी संबंधित एका हत्येने संपूर्ण शहर हादरले. कुख्यात गुंड शेखू याचा पुतण्या असद उर्फ अमन खान याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली असून, या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुटाळा तलाव परिसरात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, असद उर्फ अमन खान, मयूर जाधव आणि त्यांचे काही मित्र मक्याचे कणीस खाण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते.
यावेळी कणीस आणण्यासाठी गेलेल्या मयूर जाधव याचा तेथे उपस्थित असलेल्या योगेंद्र उर्फ लाला शिवाकांत पांडे आणि त्याच्या साथीदारांशी किरकोळ वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर हा वाद चिघळत गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर लाला पांडेने आपल्या इतर साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतल्याची माहिती समोर आली आहे.
हाणामारीदरम्यान लाला पांडे आणि त्याच्या साथीदारांनी धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात असद उर्फ अमन खान याच्यावर वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या असदचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र मयूर जाधव गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मृत असद उर्फ अमन खान हा नागपूरच्या गुन्हेगारी विश्वातील कुख्यात नाव असलेल्या शेखू याचा पुतण्या असल्याने या घटनेने पोलीस दलासह संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेनंतर नागपूर पोलिसांनी आणि क्राइम ब्रँचने तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत कारवाई सुरू केली. या प्रकरणात आतापर्यंत ७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यामध्ये ४ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. तसेच योगेंद्र उर्फ लाला शिवाकांत पांडे, जितेंद्र उर्फ जंगली पांडे आणि दीपक उर्फ प्रिन्स गुप्ता यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी गिट्टीखदान पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
या हत्येनंतर फुटाळा तलाव परिसरात तणावाचे वातावरण असून, नव्या पोलीस आयुक्तांसमोर कायदा व सुव्यवस्थेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपींना ताब्यात घेतले असले तरी या घटनेचे पुढील परिणाम काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरात पुन्हा वर्चस्वाच्या संघर्षातून टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता असल्याची भीती गुन्हेगारी विश्वातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.