Risod Revenue Department: दोघांचे भांडण अन् तिसऱ्याचा फायदा ही म्हण आपण नेहमीच ऐकतो; मात्र याचा प्रत्यक्ष प्रत्यय २२ जुलै रोजी रिसोड शहरात पाहायला मिळाला.
अज्ञाताने दुसऱ्याच्या जागेत टाकलेला १२ ब्रास ढब्बर बोलीतील स्पर्धेमुळे महसूल विभागाची झाली 'चांदी'!
रिसोड (Risod Revenue Department) : "दोघांचे भांडण अन् तिसऱ्याचा फायदा" ही म्हण आपण नेहमीच ऐकतो; मात्र याचा प्रत्यक्ष प्रत्यय २२ जुलै रोजी रिसोड शहरात पाहायला मिळाला. एका अज्ञात व्यक्तीने दुसऱ्याच्या खाजगी जागेत बेकायदेशीरपणे टाकलेला विहिरीचा 'ढब्बर' (गौण खनिज) महसूल प्रशासनाने जप्त करून त्याचा रीतसर लिलाव (हराशी) केला. या लिलावात शासकीय दरानुसार अवघा ६०० रुपये प्रति ब्रास असलेला ढब्बर चक्क 16750रु भावाने विकला गेल्याने हा लिलाव सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय बनला आहे.
नेमका प्रकार काय घडला?
महात्मा फुले नगरला लागून असलेल्या सर्व्हे नं. ३९७/२/ड मधील ०.४९ आर ही शेतजमीन राजकुमार कमलकिशोर छित्तरका यांच्या मालकीची आहे. या जमिनीवर कोण्या अज्ञात व्यक्तीने कोणाचीही परवानगी न घेता जबरदस्तीने कब्जा करण्याच्या उद्देशाने विहिरीचा १० ते १२ ट्रिप ढब्बर (गौण खनिज) बेकायदेशीरपणे आणून टाकला. हा प्रकार लक्षात येताच राजकुमार छित्तरका यांचे भाऊ तथा माजी नगरसेवक पवन कमलकिशोर छित्तरका यांनी तत्काळ पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयाकडे लेखी तक्रार नोंदवली. "कोणीतरी अज्ञात इसम गौण खनिजाची अवैध वाहतूक व तस्करी करत असून आमची जागा हडपण्याचा प्रयत्न करत आहे, तरी सदर गौण खनिज महसूल विभागाने जप्त करावे," अशी मागणी त्यांनी तक्रारीत केली होती.
तहसीलदारांची कारवाई अन् जिल्हाधिकार्यांचे लिलावाचे आदेश
तक्रारीची तात्काळ दखल घेत रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी घटनास्थळी महसूल कर्मचाऱ्यांना पाठवून सदर गौण खनिजाचा पंचनामा केला व अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला. जिल्हाधिकारी कार्यालयाने हे गौण खनिज लिलाव (हराशी) करून त्यातून मिळणारा निधी शासकीय महसुलात जमा करण्याचे आदेश दिले.
लिलावात चढाओढ; ६०० रुपयांचा भाव पोहोचला १६ हजारांवर!
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २२ जुलै रोजी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत १२ ब्रास ढब्बरचा जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला होता. बोली लावण्यासाठी शहरातील काही नागरिक व व्यावसायिक एकत्र आले. मात्र, लिलाव सुरू होताच बोली लावणार्यांमध्ये प्रचंड चढाओढ निर्माण झाली. साधारणपणे ६०० रुपये प्रति ब्रास सहज मिळणारा हा ढब्बर मिळवण्यासाठी उपस्थितांमध्ये ही बोली प्रतिष्ठेचा विषय बनली. पाहता पाहता बोली इतकी वाढली की, ६०० रुपयांचा ढब्बर चक्क १६ हजार रुपयांपेक्षा जास्त बोलीमध्ये गेला!
प्रशासकीय वर्तुळात अन् नागरिकांत चर्चांना उधाण!
अवघ्या १२ ब्रास ढब्बरमधून एवढा मोठा महसूल मिळेल असा विचार खुद्द महसूल विभागानेही केला नसेल. मात्र, या चढाओढीमुळे (Risod Revenue Department) महसूल विभागाची चांगलीच 'चांदी' झाली असून, “अज्ञाताने ढब्बर टाकला, जागेच्या मालकाने तक्रार केली आणि दोघांच्या या प्रकरणात महसूल विभागाचा भलताच फायदा झाला” अशीच चटपटीत चर्चा सध्या रिसोड शहरात रंगली आहे.