गडचिरोली जिल्ह्यातील कोरची पोलिसांनी कारवाई करत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीस ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 6 लाख 51 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गडचिरोली (Prohibited Flavoured Tobacco) : गडचिरोली जिल्ह्यातील कोरची पोलिसांनी कारवाई करत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीस ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 6 लाख 51 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कोरची पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 80/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 च्या कलम 59(i), 26(2)(i), 26(2)(iv), 27(3)(e), 3(1)(zz)(v) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी सुरेश पोसन्ना तोरेम (वय 45), अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, गडचिरोली आहेत. तर आरोपी नितेश लेखराज रहेजा (वय 40), व्यवसाय किराणा दुकानदार, रा. कोरची याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 9 जून 2026 रोजी सपोनि भगतसिंह दुल्हत व पोलिस पथक गडचिरोली जिल्हा परिसरात अवैध धंद्यांची माहिती घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कोरची येथे सापळा रचला. मौजा कोरची ते बोटेकसा मुख्य मार्गावर वाहनांची तपासणी सुरू असताना एक संशयित चारचाकी वाहन आढळून आले.
सदर वाहन थांबवून पंचांसमक्ष तपासणी केली असता वाहनामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या वाहतूक करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळी व नंतर पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष पाहणी करून दिलेल्या लेखी तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला.
या कारवाईत 2 लाख 51 हजार 550 रुपये किमतीचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तसेच 4 लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन असा एकूण 6 लाख 51 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार हे करीत आहेत.