वडसा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक संतोष रमेश मरस्कोल्हे (वय ५६, रा. आरमोरी) हे शनिवारी पहाटे झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाले.
आरमोरी–वडसा मार्गावरील रेल्वे पुलाजवळ पहाटेची घटना
आरमोरी (Police Sub Inspector) : वडसा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक संतोष रमेश मरस्कोल्हे (वय ५६, रा. आरमोरी) हे शनिवारी पहाटे झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झाले. हा अपघात आरमोरी–वडसा मार्गावरील आरमोरीपासून सुमारे १ किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे पुलाजवळ आज सकाळी अंदाजे ५.३० वाजताच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक संतोष मरस्कोल्हे यांनी वडसा पोलीस ठाण्यात पहाटे ५.०० वाजेपर्यंत आपली ड्युटी पूर्ण केली. त्यानंतर ते दुचाकीने आपल्या मूळगावी आरमोरीकडे निघाले होते. दरम्यान, आरमोरी–वडसा रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळ त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुचाकी घसरून अपघात झाला की एखादा वन्य प्राणी अचानक समोर आल्याने किंवा दुचाकीला धडकल्याने हा अपघात झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. संबंधित यंत्रणेकडून या घटनेचा तपास सुरू असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच मरस्कोल्हे यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने ब्रह्मपुरी येथील आस्था हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना नागपूरमधील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेमुळे पोलीस विभागासह आरमोरी परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना सहकारी आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.