Grand Ijtema Program: परभणीत झरी येथील इज्तेमाची कार्यक्रम शांततापूर्ण वातावरणामधून संपन्न झाली. धार्मिक संमेलनात 'ईमान, मानवत्या संदेश'च्या सन्दर्भात समाजसामान्यांना सल्ला देण्यात आला.
झरी येथील भव्य धार्मिक सोहळ्यात देशाच्या शांतता, सौहार्द व समृद्धीसाठी विशेष दुआ; पोलिसांचा चोख बंदोबस्त
परभणी (Grand Ijtema Program) : तालुक्यातील झरी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य इज्तेमा कार्यक्रमाचा हजारो मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत मंगळवारी अत्यंत शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात समारोप झाला. ईमान, मानवता, बंधुभाव, सदाचार, समाजसेवा आणि राष्ट्रप्रेमाचा प्रेरणादायी संदेश देत देशात शांतता व सौहार्द कायम राहावे, यासाठी विशेष दुआ करण्यात आली.
परभणी तालुक्यातील झरी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य इज्तेमा कार्यक्रमास राज्यातील विविध भागांतून हजारो मुस्लिम बांधवांनी उपस्थिती लावली. संपूर्ण कार्यक्रम धार्मिक श्रद्धा, आध्यात्मिक वातावरण आणि सामाजिक एकात्मतेचा संगम ठरला. कार्यक्रमाचा समारोप अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात झाला.
कार्यक्रमात पुणे येथील धर्मगुरूंनी मार्गदर्शन करताना ईमान, मानवता, बंधुभाव, शांतता आणि सदाचाराचा संदेश दिला. "शांती हाच मानवधर्म असून प्रत्येक धर्म प्रेम, सहकार्य आणि सदाचाराची शिकवण देतो. समाजात द्वेष नव्हे तर सौहार्द निर्माण करणे हीच खरी धर्मसेवा आहे," असे त्यांनी सांगितले. समाजात शांतता टिकवण्यासाठी संयम, सहनशीलता आणि परस्पर सन्मान आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी पवित्र कुरआन शरीफमधील आयतींचा संदर्भ देत नैतिक मूल्यांचे महत्त्व विशद करण्यात आले. गरजू, अनाथ, निराधार, विधवा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करणे हीच खरी इबादत असल्याचे सांगण्यात आले. समाजातील वंचितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.धर्मगुरूंनी आपल्या भाषणात, "आपल्या वागण्या-बोलण्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये. दुसऱ्याला मदत करणे हेच सर्वात मोठे पुण्य आहे," असे सांगत प्रत्येकाने स्वतःपासून सकारात्मक बदलाची सुरुवात करावी, असे आवाहन केले. तसेच इज्तेमासाठी जागा, वीज, पाणी तसेच वेअरहाऊस व जिनिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाजसेवक व कृषिभूषण कांतराव काका देशमुख यांचे विशेष आभार मानले.
कार्यक्रमादरम्यान स्वयंसेवकांनी वाहनतळ, पिण्याचे पाणी, भोजन, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेचे उत्कृष्ट नियोजन केले. त्यामुळे हजारोंच्या उपस्थितीतही कार्यक्रम सुरळीत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.समारोपावेळी देशात शांतता, सौहार्द, बंधुभाव आणि समृद्धी कायम राहावी, सर्व धर्मांमध्ये परस्पर प्रेम वृद्धिंगत व्हावे तसेच शेतकरी, कामगार, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, यासाठी विशेष दुआ करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून अग्निशमन दल व रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती
इज्तेमा कार्यक्रमाला समाजसेवक व कृषिभूषण कांतराव काका देशमुख, जिल्हा परिषद गटनेते दिलीपराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य माणिकराव हरकळ, दैवत लाटे, दिलीपराव नेते, विशाल देशमुख, नरेश देशमुख आदींनी भेट देऊन उपस्थिती दर्शविली. विशेष दुआपर्यंत उपस्थित राहून त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.