सांगोला तालुक्यातील घेरडी येथे कौटुंबिक वादातून एका विवाहित महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना बुधवारी (१ जुलै) रात्री घडली.
घेरडी येथे २८ वर्षीय वैष्णवी यमगरने साडेतीन महिन्यांच्या मुलीसह आणि १५ महिन्यांच्या मुलाला कवटाळत संपवले जीवन; वडिलांनी काही तासांपूर्वीच केली होती समजूत
सोलापूर (Mother Suicide) : सांगोला तालुक्यातील घेरडी येथे कौटुंबिक वादातून एका विवाहित महिलेने आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना बुधवारी (१ जुलै) रात्री घडली. या घटनेत वैष्णवी आशिष यमगर (वय २८), तेजश्री आशिष यमगर (वय साडेतीन महिने) आणि रुद्राक्ष आशिष यमगर (वय १५ महिने) यांचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष यमगर हे मुंबईत ट्रेलर चालक म्हणून काम करतात. ते पत्नी वैष्णवी आणि दोन्ही मुलांसह मुंबईत वास्तव्यास होते. कर्नाटकी बेंदूर सणानिमित्त संपूर्ण कुटुंब काही दिवसांपूर्वी मूळ गावी घेरडी येथे आले होते. याच काळात पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरून किरकोळ वाद झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, वैष्णवीचे वडील बाळू बाबूराव थोरबोले (रा. शिरनांदगी, ता. मंगळवेढा) हे मुलीच्या घरी आले होते. त्यांनी वैष्णवी आणि तिचा पती आशिष यांची समजूत काढली. वाद मिटल्याची भावना मनात ठेवून ते सायंकाळी सुमारे ५.३० वाजता आपल्या गावी परतले. मात्र, त्यानंतर काही तासांतच ही दुर्दैवी घटना घडली.
बुधवारी रात्री सुमारे साडेसातच्या सुमारास यमगर कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून जेवण करत होते. यावेळी १५ महिन्यांचा रुद्राक्ष आणि साडेतीन महिन्यांची तेजश्री वडिलांसोबत जेवत होते. त्याच वेळी वैष्णवीने "मुलांना झोपवते" असे सांगत दोन्ही मुलांना ताटावरून उठवले आणि त्यांना घेऊन घराबाहेर गेली.
बराच वेळ उलटूनही वैष्णवी आणि दोन्ही मुले परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. शोध घेत असताना घराजवळील विहिरीकडे गेल्यावर वैष्णवीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. ही घटना पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यानंतर रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास विहिरीतील खोल पाण्यातून रुद्राक्ष आणि तेजश्री या दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या घटनेची माहिती मृत वैष्णवीचे वडील बाळू बाबूराव थोरबोले यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
एका क्षणाच्या संतापातून किंवा कौटुंबिक तणावातून घडलेल्या या घटनेने तीन निष्पाप जीवांचा अंत झाला. काही तासांपूर्वीच लेकीची समजूत काढून परतलेल्या वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, यमगर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. घेरडीसह संपूर्ण पंचक्रोशीत या घटनेबद्दल तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.