NEET पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मुंबईत एक वादग्रस्त घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे
दादरमधील आंदोलनावेळी सिव्हिल ड्रेसमधील पोलिसावर गैरवर्तनाचा आरोप; मुंबई पोलिसांनी आरोप फेटाळत चुकीचा अर्थ लावल्याचा दावा केला
मुंबई : NEET पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मुंबईत एक वादग्रस्त घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे. दादर येथे कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनावेळी एका विद्यार्थिनीने सिव्हिल ड्रेसमधील पोलिस कर्मचाऱ्यावर गैरवर्तन आणि विनयभंगाचा आरोप केला असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दिल्लीतील जंतर मंतर परिसरात गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी NEET पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. त्याच आंदोलनाला पाठिंबा म्हणून मुंबईतील दादर येथेही गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनादरम्यान ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आंदोलन सुरू असताना सिव्हिल ड्रेसमधील एक व्यक्ती विद्यार्थिनीला पकडून बाजूला नेत असल्याचे दिसत आहे. संबंधित विद्यार्थिनीचा दावा आहे की, आंदोलन हटविण्याच्या कारवाईदरम्यान त्या व्यक्तीने तिच्याशी आक्षेपार्ह वर्तन केले तसेच धक्काबुक्की केली. या आरोपांनंतर संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी विविध स्तरातून केली जात आहे.
व्हायरल व्हिडिओवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संबंधित प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हटले की, "हा व्हिडिओ बघून डोक्याची तिडीक उठली. कोण आहे नराधम? याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा किती किळसवाणं कृत्य करतोय. हा पोलीस असेल तर पहिले याला निलंबित नाही तर पोलीस दलातून बडतर्फ करा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा. एक वेगळी प्रतिष्ठा असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली ही कीड आहे."
या प्रकरणावर मनसेनेही संताप व्यक्त केला आहे. संबंधित व्यक्ती शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचा दावा करण्यात आला असून, त्याचे तात्काळ निलंबन करून संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. पोलिसांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे संबंधित व्हिडिओच्या आधारे त्यांच्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा अत्यंत बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे म्हटले आहे. तसेच उपलब्ध व्हिडिओ आणि इतर पुराव्यांच्या आधारे या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास केला जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे.