Manora Accident-Prone Road: विठोली-कारखेडा वरोली रस्त्यावर खड्डे, चिखलामुळे अपघातांची जोखिम वाढत असल्याने तातडीने डांबरिकरण करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी निवेदन दिले आहे.
मानोरा (Manora Accident-Prone Road) : अपघाताला आमंत्रण देणाऱ्या तालुक्यातील विठोली - कारखेडा ते वरोली रस्त्याचे तातडीने मजबुतीकरण व डांबरीकरण या रस्त्याच्या वाटेवर ये - जा करणाऱ्या नागरिकांना दिलासा द्यावा, असे मागणीचे निवेदन तहसीलदार यांना दि. १४ जुलै रोजी योगेश अशोकराव सोळंके यांच्यासह नागरिकांनी दिले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, विठोली - कारखेडा ते वरोली हा (Manora Accident-Prone Road) ग्रामीण रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खड्डेमय आणि दुरावस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता ग्रामीण भागातील प्रमुख जोडरस्ता आहे. परंतु सध्या या रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यात चिखल व खड्ड्यांमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. ८ ते १० गावांना जोडणाऱ्या या रस्त्यावरून रोज शेकडो विद्यार्थी, शेतकरी व रुग्णांची ये-जा असते. मात्र रस्त्याची दुरावस्था असल्याने वाहनांचे नुकसान होत आहे आणि अपघातांचा धोकाही वाढला आहे.
यापूर्वी जिल्हाधिकारी यांना रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लेखी निवेदन दिले होते. तसेच १३ जुलै २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या सभेत देखील हा विषय मांडण्यात आला होता. मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे मानोरा ते कारखेडा या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण व रुंदीकरण करण्यात यावे, रस्त्यावरील मोठे खड्डे तात्पुरते बुजवून वाहतुकीसाठी सुरक्षित करण्यात यावे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था करण्यात यावी, जर लवकरात लवकर रस्त्याच्या दुरुस्तीची कार्यवाही न झाल्यास, परिसरातील नागरिकांसह रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे. प्रशासनाने या (Manora Accident-Prone Road) गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे काम सुरू करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. निवेदन देतेवेळी राजेंद्र देशमुख, माजी सरपंच भानुदास जाधव, सुशांत जाधव, राजेंद्र राऊत, विजय राठोड, शिवाजी सोळंके, नारायण सोळंके आदी उपस्थित होते.