Farm Loan Waiver Scheme: हिंगोली जिल्ह्यातील ४४,१७७ शेतकर्यांना 'अहिल्या देवई कर्जमुक्ती योजना २०२६'चा लाभ सुनिश्चित करण्यासाठी तात्काळ बँक खाते आधारप्रमाणिकरण
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026
लाभार्थ्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण व अॅग्रीस्टॅक आयडीची प्रक्रिया पूर्ण करावी: जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे
हिंगोली (Farm Loan Waiver Scheme) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यांतील एकूण 673 गावांतील 44 हजार 177 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी दि. 24 जुलै 2026 रोजी flrs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, हिंगोली कार्यालयासह हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ व सेनगाव येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयांच्या नोटीस बोर्डावर नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, परभणीच्या हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये तसेच संबंधित ग्रामपंचायत कार्यालयांच्या नोटीस बोर्डावरही ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यादीतील सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी तात्काळ जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन त्यांच्या बँक खात्याचे आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सुरेखा फुफाटे यांनी केले आहे. तसेच ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्याप अॅग्रीस्टॅक आयडी तयार केलेला नाही, त्यांनीही त्वरित आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन अॅग्रीस्टॅक आयडी तयार करून घ्यावा. अन्यथा योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच सर्व सहाय्यक निबंधक, बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबंधित शाखा, विकास सेवा संस्था, ग्रामपंचायत व चावडी येथे लाभार्थ्यांची यादी तात्काळ प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये हिंगोली तालुक्यातील 142 गावांतील 12,118 लाभार्थी, वसमत तालुक्यातील 136 गावांतील 6,441, कळमनुरी तालुक्यातील 144 गावांतील 9,992, सेनगाव तालुक्यातील 130 गावांतील 7,348 आणि औंढा नागनाथ तालुक्यातील 121 गावांतील 8,278 लाभार्थींचा समावेश असून, एकूण 673 गावांतील 44,177 पात्र शेतकरी या यादीत समाविष्ट आहेत. योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.