Mission Transformation Yojana: 'मिशन परिवर्तन – वाटचाल नशामुक्तीकडे' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा आणि यशस्वी करिअर या विषयांवर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम
पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन; प्रबोधनात्मक नाट्यप्रयोगाने वेधले लक्ष
चिखली (Mission Transformation Yojana) : स्थानिक श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात 'मिशन परिवर्तन – वाटचाल नशामुक्तीकडे' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा आणि यशस्वी करिअर या विषयांवर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पडोळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे (आयपीएस) प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटतर्फे पथसंचलन करून पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख तथा आयक्यूएसी समन्वयक एस. एन. मेंढे होते. यावेळी चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भूषण गावंडे तसेच कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक दिलीप उन्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात दिलीप उन्हाळे यांनी 'मिशन परिवर्तन – वाटचाल नशामुक्तीकडे' या उपक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट करून उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. यानंतर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्याचे उपाय, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, तसेच यशस्वी करिअरसाठी आवश्यक असलेली शिस्त, कठोर परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहून ध्येयवादी जीवन जगण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे शिवरंजन नाट्य संस्थेने सादर केलेला प्रबोधनात्मक नाट्यप्रयोग. या नाट्यप्रयोगातून तरुणाईसमोरील विविध आव्हाने, सोशल मीडियाच्या वापरातील धोके आणि व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. अध्यक्षीय समारोपात एस. एन. मेंढे यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक, संशोधन, विद्यार्थी सुरक्षा आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे उपक्रम तसेच उपलब्ध अभ्यासक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमानंतर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शिस्त, प्राध्यापकांचे कार्य आणि संस्थेच्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा चिखले यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. सतीश काळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलिस सहाय्य निरीक्षक ढोमणे, पोलिस उपनिरीक्षक आश्विनी गाढे, पोलिस सहाय्य उपनिरीक्षक विष्णू नेवरे, जमादार विजय किटे, राजेश मापारी, प्रा. लेफ्टनंट किरण पडघान, महाविद्यालयाचे एनसीसी युनिट तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षेबाबत जागरूकता आणि करिअरविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणारा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.