लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी देशाला स्वराज्याची प्रेरणा दिली.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात अजित डोवाल यांच्या कार्याचा गौरव; राष्ट्रसुरक्षेतील योगदानाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सलामी
पुणे : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी देशाला स्वराज्याची प्रेरणा दिली, तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भारत जगासमोर सुरक्षेचे प्रभावी मॉडेल उभे करत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पुण्यात आयोजित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६ सोहळ्यात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना अमित शाह यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी शिंदे बोलत होते.
भाषणाच्या प्रारंभी शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाला अभिवादन केले. त्यांनी सांगितले की, १ ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारामुळे विशेष महत्त्वाचा ठरला आहे. या पुरस्कार सोहळ्याला अनेक वेळा उपस्थित राहण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
शिंदे यांनी आठवण करून दिली की, २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. याआधी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह अनेक मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यंदा या मानाच्या परंपरेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे नाव जोडले गेल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
लोकमान्य टिळकांनी ज्या पुण्यभूमीत स्वराज्याचा संदेश दिला, त्याच भूमीवर देशाच्या सुरक्षेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव होत असल्याचे सांगत शिंदे यांनी हा क्षण अभिमानास्पद असल्याचे म्हटले.
ते पुढे म्हणाले, "'अजित डोवाल' हे नावच त्यांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी पुरेसे आहे." महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या वतीने त्यांनी डोवाल यांचे अभिनंदन करत त्यांच्या राष्ट्रसेवेला सलाम केला. अमित शाह यांच्या हस्ते होत असलेला हा सन्मान म्हणजे "दुग्धशर्करा योग" असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिंदे यांच्या मते, एका बाजूला देशाच्या अंतर्गत सुरक्षेला नवी दिशा देत नक्षलवाद, दहशतवाद आणि देशविघातक शक्तींविरोधात निर्णायक कारवाई करणारे अमित शाह, तर दुसऱ्या बाजूला देशाच्या सीमासुरक्षेला बळकटी देत राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेला नवी धार देणारे अजित डोवाल आहेत. हा सोहळा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या विचारांचा गौरव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाषणात लोकमान्य टिळकांच्या कार्याचाही उल्लेख करत शिंदे म्हणाले की, ब्रिटिश सत्तेच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी स्वतंत्र गुप्त माहितीचे समांतर जाळे (Counter Intelligence Network) उभे केले होते. त्या राष्ट्रनिष्ठ परंपरेचा प्रभाव आजच्या आधुनिक भारतीय गुप्तचर यंत्रणेतही दिसून येतो आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांनी तो वारसा अधिक सक्षमपणे पुढे नेल्याचे त्यांनी सांगितले.
सुवर्ण मंदिरातील कारवाया, दहशतवादविरोधी मोहिमा, राष्ट्रीय सुरक्षा धोरण अधिक मजबूत करणे तसेच पाकिस्तानमध्ये तब्बल सात वर्षे अंडरकव्हर एजंट म्हणून केलेले काम ही त्यांच्या राष्ट्रसेवेची उल्लेखनीय उदाहरणे असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. 'राष्ट्र प्रथम' हा अजित डोवाल यांच्या कार्याचा मूलमंत्र असल्याचे सांगत अनेकजण त्यांना 'भारताचे जेम्स बॉण्ड' म्हणतात. मात्र, आपल्या दृष्टीने ते 'भारताचे धुरंधर रणनीतीकार' असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.