आमदार सचिन अहिर यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता ठाकरे गटातील आणखी एका विधान परिषद आमदाराला आपल्या गटात आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या आमदारांवर शिंदे गटाचे लक्ष; विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांच्या नावाचीही चर्चा
मुंबई (Legislative Council) : आमदार सचिन अहिर यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता ठाकरे गटातील आणखी एका विधान परिषद आमदाराला आपल्या गटात आणण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ठाकरे गटाच्या विधान परिषदेतील उर्वरित पाच आमदारांपैकी सुनील शिंदे हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले असल्याने त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सचिन अहिर यांची २०२२ मध्ये विधान परिषदेसाठी निवड झाली होती. त्यावेळी शिवसेनेत फूट पडलेली नव्हती आणि ते धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आले होते. त्यामुळे त्यांच्या शिंदे शिवसेनेतील प्रवेशानंतर ठाकरे गटाकडून त्यांच्याविरोधात कायदेशीर पातळीवर कारवाई करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.
याच धर्तीवर सुनील शिंदे यांचीही २०२१ मध्ये विधान परिषदेसाठी निवड झाली होती. त्या काळातही शिवसेना एकसंघ होती आणि तेही धनुष्यबाण चिन्हावरच निवडून आले होते. त्यामुळे त्यांनाही शिंदे शिवसेनेत सामील करून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सुनील शिंदे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ २०२७ पर्यंत आहे. ठाकरे गटाच्या विधान परिषदेतील पाच आमदारांमध्ये धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले ते शेवटचे आमदार असल्याने त्यांना आपल्या गटात आणण्यास शिंदे शिवसेना प्राधान्य देत असल्याची चर्चा आहे. विशेषतः वरळी मतदारसंघात ठाकरे गटाची राजकीय ताकद कमी करण्याच्या दृष्टीनेही या हालचालींकडे पाहिले जात आहे.
दरम्यान, सचिन अहिर यांनी काल शिंदे शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांना विधान परिषद उपसभापतीपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर सुनील शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना नाराजी व्यक्त केली होती. पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याची गरज होती. सचिन अहिर यांच्या हालचालींबाबत मला आधीच काही प्रमाणात माहिती होती. मात्र, मी पक्षातील छोटा कार्यकर्ता असल्यामुळे त्यावर सार्वजनिकपणे भाष्य करू शकलो नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
ठाकरे गटाचे विधान परिषदेतील आमदार :
- सुनील शिंदे
- ज. मो. अभ्यंकर
- अंबादास दानवे
- मिलिंद नार्वेकर
- अनिल परब