Lawyers Union Andolan: जिल्हा वकील संघाने नवी दिल्लीतील जंतरमंदर येथे घडलेल्या लाठीचार्जविरुद्ध चळवळीला पाठिंबा देताना केंद्रीय मंत्रालयात अनेक मागण्या व्यक्त केली आहेत.
हिंगोली (Lawyers Union Andolan) : जिल्हा वकील संघाने दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या जनआंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असून २० जुलै रोजी झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. संघाच्या वतीने राष्ट्रपतींना २४ जुलै २०२६ रोजी निवेदन पाठवून याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. श्रीधर रामकृष्णराव घुगे आणि सचिव अॅड. मिलिंद आत्माराम कांबळे यांच्या स्वाक्षरीने पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोनम वांगचुक, अभिजीत दिपके, नेहा बोरा यांच्या नेतृत्वाखाली जंतरमंतर येथे सुरू असलेले आंदोलन पूर्णपणे शांत, संयमी, अहिंसक आणि घटनात्मक मार्गाने सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या या जनआंदोलनाला संघाचे पूर्ण समर्थन आहे. मात्र २० जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्ज केला.
ही (Lawyers Union Andolan) घटना पूर्णपणे बेकायदेशीर आणि निंदनीय असून त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या मागण्यांनाही वकील संघाने पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, राष्ट्रीय परीक्षा संस्था बरखास्त करून राज्यस्तरीय वैद्यकीय परीक्षा घेणे, नीट परीक्षा पारदर्शक करणे आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जची चौकशी करून दोषींना निलंबित करणे यांचा समावेश आहे.हे निवेदन हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना पाठवण्यात आले असून त्याची प्रत जिल्हाधिकारी हिंगोली, उपविभागीय अधिकारी हिंगोली आणि तहसीलदार हिंगोली यांनाही देण्यात आली आहे.