'मंत्री प्लाझा'तील 'नाईस स्पा' सेंटरमधील रॅकेटचा पर्दाफाश!
पीडित महिलेची सुटका; स्पा मालक व व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल
लातूर (Latur Sex Trade) : स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली बाहेरगावाहून महिलांना बोलावून त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून पैशांचे आमिष दाखवत पुरुष ग्राहकांकडून देहव्यापार करून घेणाऱ्या रॅकेटचा लातूर पोलिसांनी सोमवारी पर्दाफाश केला. शहराच्या औसा रिंग रोडवरील मंत्री प्लाझा कॉम्प्लेक्समधील नाईस स्पा सेंटरमध्ये हा रंगेल खेळ चालताना पोलिसांनी रंगेहात पकडून स्पा सेंटर मधील पीडित महिलेची सुटका केली. तसेच स्पा मालक व व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२० जुलै २०२६ रोजी दुपारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील महिला पोलीस अमलदार लता गिरी यांना औसा रिंग रोड भागातील "नाईस स्पा" सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली बाहेरील जिल्हा व राज्यातून महिलांना बोलावून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हा छापा टाकला.
बनावट ग्राहकाकडून व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ठरलेल्या संकेताप्रमाणे छापा टाकण्यात आला. स्पा सेंटरमधील रूम क्रमांक १ मध्ये एक महिला आढळून आली. तसेच यावेळी स्पा सेंटरचा व्यवस्थापक आदित्य जगन रसाळ (वय २४ वर्षे, रा. निवळी, ता. जि. लातूर) सापडला. चौकशीदरम्यान सदर स्पा नितीन रावसाहेब काळुंके (रा. नांदगाव, ता. जि. लातूर) यांच्या मालकीचा असल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी (Latur Sex Trade) एमआयडीसी पोलीस स्टेशन, लातूर येथे गुन्हा क्रमांक ४८६/२०२६ अन्वये कलम १४३(३)(५) भारतीय न्याय संहिता (बी एन एस) तसेच अनैतिक व्यवसाय (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ चे कलम ३, ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आदित्य जगन रसाळ यास अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी नितीन रावसाहेब काळुंके याचा शोध सुरू आहे. सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करून तिला शासकीय महिला निवारागृह लातूर येथे सुरक्षित ठेवण्यात आले असून पुढील आदेशासाठी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
व्यवस्थापकाचा मोबाईल जप्त!
छाप्यादरम्यान व्यवस्थापकाच्या ताब्यातून मोबाईल फोन, तर काउंटरमधून स्पा महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. तपासामध्ये स्पा सेंटरच्या माध्यमातून बाहेरगावाहून महिलांना बोलावून त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून पैशांचे आमिष दाखवत पुरुष ग्राहकांकडून देहव्यापार करून घेत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे, सहायक पोलीस निरीक्षक अजिनाथ पाटील, महिला पोलीस अमलदार लता गिरी, सुधानती वंगे, पोलीस अंमलदार सदानंद योगी, सचिन मुंडे यांनी पार पाडली. विशेष म्हणजे, गुन्ह्याचा पुढील तपास सध्या लातूरमध्ये चर्चेत असलेले पोलीस निरीक्षक समाधान चवरे हे करीत आहेत.